बारावीतील गुणवंताचा सत्कार
By Admin | Updated: June 3, 2017 00:39 IST2017-06-03T00:39:14+5:302017-06-03T00:39:14+5:30
बारावीच्या परीक्षेत जिल्ह्यातून प्रथम आलेली नुपूर धमगाये (९४.४६) टक्के, द्वितीय शुभम वराटकर (९४.३०) टक्के व तृतीय आलेली कांचन राजुरकर (९४.१५) टक्के यांच्या घरी जाऊन सत्कार करण्यात आला.

बारावीतील गुणवंताचा सत्कार
घरोघरी जाऊन केला सन्मान : देवराव भोंगळे यांची उपस्थिती
लोकमत न्यूज नेटवर्क
बल्लारपूर : बारावीच्या परीक्षेत जिल्ह्यातून प्रथम आलेली नुपूर धमगाये (९४.४६) टक्के, द्वितीय शुभम वराटकर (९४.३०) टक्के व तृतीय आलेली कांचन राजुरकर (९४.१५) टक्के यांच्या घरी जाऊन सत्कार करण्यात आला. या सत्काराचे आयोजन जिल्हा परिषद, महानगरपालिका व शिक्षण विभागामार्फत शिक्षक भारती संघटनेच्यावतीने गुरुवारी करण्यात आले.
जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, महानगरपालिका अध्यक्ष अंजली घोटेकर, जिल्हा परिषद उपाध्यक्ष कृष्णा सहारे, मनपाचे स्थायी समितीचे सभापती राहूल पावडे, जि.प. महिला बाल कल्याण सभापती अर्चना जीवतोडे, शिक्षणाधिकारी संजय डोर्लीकर, शिक्षक भारती संघटनेचे जिल्हा अध्यक्ष प्राचार्य नरेंद्र बोबडे, स्मिता ठाकरे, रमेश पायपरे, मनोज पावडे, राजू साखरकर, यांनी गुणवंतांच्या घरोघरी जावून पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ व पेढा भरवून सत्कार केला.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे म्हणाले, विद्यार्थ्यांच्या शालेय जीवनाच्या जडणघडणीत शिक्षकांसह पालकांचेही महत्त्वपूर्ण योगदान असते. पालकांचे योगदान ध्येयपूर्ती साधण्यासाठी मोलाची भूमिका बजावते. गुणवंतांनी जिल्ह्याची मान उंचावली आहे. यासाठी त्यांनी अभ्यासातील सातत्य, चिकाटीने बाळगलेले ध्येय, ध्येयाला साध्य करण्यासाठी घेतलेले परिश्रम कारणीभूत असून यशोशिखर गाठण्यास मदत करणारे ठरले आहे. उद्याचे भवितव्य त्यांच्या यशातून प्रगल्भ होणार असून गुणवंतांची प्रेरणा अन्य विद्यार्थ्यांनी घ्यावी, असे मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन शिक्षक भारती संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्राचार्य नरेंद्र बोबडे यांनी केले. यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.