राष्ट्रवादी महिला काँग्रेसतर्फे कर्तृत्ववान महिलांचा सत्कार
By Admin | Updated: March 14, 2016 01:00 IST2016-03-14T01:00:44+5:302016-03-14T01:00:44+5:30
चंद्रपूर जिल्हा राष्ट्रवादी महिला काँग्रेस (ग्रामीण) च्या वतीने चंद्रपूर जिल्ह्यातील सामाजिक क्षेत्रात अविस्मरणीय योगदान

राष्ट्रवादी महिला काँग्रेसतर्फे कर्तृत्ववान महिलांचा सत्कार
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्हा राष्ट्रवादी महिला काँग्रेस (ग्रामीण) च्या वतीने चंद्रपूर जिल्ह्यातील सामाजिक क्षेत्रात अविस्मरणीय योगदान देणाऱ्या महिलांचा सत्कार कार्यक्रम परशुराम भवन येथे बुधवारी पार पडला.
प्रास्ताविकातून जिल्हाध्यक्ष बेबीताई उईके म्हणाल्या, ८ मार्च १९०८ रोजी अमेरिकेतील शिकागो शहरातील कारखान्यात १८ ते २० तास काम करणाऱ्या महिलांना पुरुषाबरोबरीचे वेतन मिळत नसल्यामुळे हक्काच्या न्याय मागण्यासाठी कारखान्याच्या मालकाविरोधात त्यांनी संघर्ष केला. म्हणून आज आपल्याला आठ तास कामाचा दिवस मिळत आहे. आज आपल्यासमोर अनेक प्रश्न आहेत. महिलांवरील वाढते अत्याचार, महागाई, बेरोजगारी व शेतकऱ्यांच्या आत्महत्या हे अन्याय थांबविण्यासाठी महिलांनी संघटीत होऊन संघर्ष करण्याची गरज आहे, असे सांगितले.
प्रमुख वक्ता अॅड. जयश्री इंगळे यांनी महिलाविषयक कायदे या विषयावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी विधानसभा उपाध्यक्ष अॅड. मोरेश्वरराव टेमुर्डे होते.
ते म्हणाले, शरद पवार यांनी महिलांना ५० टक्के आरक्षण मिळवून दिले. हे आरक्षण सहजासहजी मिळाले नसून त्यांना सुद्धा अनेक परिश्रम घ्यावे लागले. महिलांनी पुरुषांच्या बरोबरीने राजकीय क्षेत्रात दिलेल्या आरक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगराध्यक्ष दीपक जयस्वाल, ज्येष्ठ नेते अॅड. हिराचंद बोरकुटे, शोभा पोटदुखे, किसान सभा अध्यक्ष सुरेश रामगुंडे, डी. के. आरीकर, माजी जिल्हाध्यक्षा हेमुता जानकर यांनी मार्गदर्शन केले.
संचालन सीमा हनवते यांनी केले तर आभार वंदना आवळे यांनी मानले. यावेळी छायाताई चटप, कविता रामटेके, सावित्री भगत, सिंधुताई मडावी, सुलोचना कर्णेवार यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला तालुकाध्यक्ष पूजा उईके, माया ठावरी, माधुरी पांडे, सरस्वती गावंडे, सुचित्रा बोरकर, शुभांगी टापरे, सुमित्रा वैद्य, मनीषा कडूकर व शेकडो महिलांची उपस्थिती होती. (स्थानिक प्रतिनिधी)