पोलिसांच्या सर्वोत्तम कामगिरीचा सत्कार
By Admin | Updated: January 3, 2016 01:30 IST2016-01-03T01:30:23+5:302016-01-03T01:30:23+5:30
पुरस्कार, सत्कारातून कर्तव्यनिष्ठेने काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची जबाबदारी पुन्हा वाढते, असे बोलले जाते.

पोलिसांच्या सर्वोत्तम कामगिरीचा सत्कार
प्रत्येक महिन्यात कार्यक्रम : पोलीस अधीक्षकांची योजना
चंद्रपूर : पुरस्कार, सत्कारातून कर्तव्यनिष्ठेने काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची जबाबदारी पुन्हा वाढते, असे बोलले जाते. हाच धागा ओळखून पोलीस विभागाने उत्कृष्ट काम करणाऱ्या पोलिसांचा प्रत्येक महिन्यात सत्कार करण्याचा निर्णय घेतला आहे. उत्कृष्ट कामाची पावती सत्काराच्या रूपात उतरविण्याचा हा निर्णय कर्तव्यदक्ष पोलिसांचे निश्चितच मनोबल उंचावणारा ठरणार आहे. जिल्हा पोलीस विभागाकडून १ जानेवारीपासून या अभिनव उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला आहे.
पोलीस विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सध्याच्या धावपळीच्या व गुंतागुंतीच्या जीवनात अनेक परिस्थितीशी सामना करावा लागत आहे. अशा स्थितीतही पोलीस कर्मचारी आपली जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडत आहेत. त्यामुळे पोलीस दलाचे नावलौकिक होण्यासोबतच पोलिसांच्या कामाची गुणवत्ताही वाढत आहे. कर्तव्यदक्ष पोलीस कर्मचाऱ्यांचे मनोबल उंचावण्याच्या उद्देशातून जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप दिवाण यांनी दरमहा सत्कार कार्यक्रम घेण्याचा अभिनव उपक्रम सुरू केला आहे. या माध्यमातून पोलिसांची जनमानसात प्रतिमा उंचावण्यासोबतच पोलीस दलाच्या कामकाजात सुसुत्रता आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
उत्कृष्ट काम करणाऱ्या पोलिसांची ‘उत्कृष्ट/सर्वोत्तम’ अशी निवड करून त्यांना प्रमाणपत्र, पुष्पगुच्छ आणि रिवॉर्ड देऊन सत्कार केला जाणार आहे. उत्कृष्ट ठाणे अंमलदार, उत्कृष्ट आरटीपीसी, उत्कृष्ट तपासी अंमलदार (जेएमएफसी), उत्कृष्ट तपासी अंमलदार (सेशन), उत्कृष्ट डिटेक्शन इंटलिजन्स (गुन्हे उघडकीस), उत्कृष्ठ बीट अंमलदार, उत्कृष्ट दूरक्षेत्र प्रभारी, उत्कृष्ट वाहतूक कर्मचारी, उत्कृष्ट वाहन चालक, उत्कृष्ट पैरवी अधिकारी, उत्कृष्ट कर्मचारी (नवनवीन योजना, कार्य करणारे), उत्कृष्ट पोलीस पाटील (सर्व उपविभागातून प्रत्येकी एक), उत्कृष्ट पोलीस मित्र (सर्व उपविभागातून प्रत्येकी एक), उत्कृष्ट पोलीस ठाणे (दरमहा जिल्ह्यातून एक) याप्रमाणे सत्कार केला जाणार आहे. (प्रतिनिधी)