पहाडीवरील कॉपीबहाद्दर केंद्र यंदाही निर्भय

By Admin | Updated: March 4, 2015 01:37 IST2015-03-04T01:37:28+5:302015-03-04T01:37:28+5:30

कोरपना व जिवती तालुक्यातील अनेक केंद्रावर बारावी व दहावीची परीक्षा सुरू आहे.

Fearless copper hubs at the center | पहाडीवरील कॉपीबहाद्दर केंद्र यंदाही निर्भय

पहाडीवरील कॉपीबहाद्दर केंद्र यंदाही निर्भय

कॉपीसाठी सोशल मीडियाचा वापर ? : अनेक केंद्रांवर मिलीभगत, अर्धा तासाअगोदरच विद्यार्थ्यांच्या हाती प्रश्नसंच
चंद्रपूर :
कोरपना व जिवती तालुक्यातील अनेक केंद्रावर बारावी व दहावीची परीक्षा सुरू आहे. या परीक्षा केंद्रांवर यावर्षीही कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा उडाला असून परीक्षार्थी कॉपीसाठी चक्क सोशल मिडीयाचा वापर करीत असल्याची परिसरात जोरदार चर्चा आहे. अर्धा तासापूर्वीच विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका माहित होत असल्याचेही ऐकायला मिळत आहे. त्यामुळे बोर्डाच्या परीक्षा पद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.
बारावीची गेल्या आठ ते दहा दिवसांपासून सुरू आहे. तर मंगळवारपासून दहावीच्या परीक्षेला सुरूवात झाली आहे. जिवती तालुक्यातील पहाडीवर परीक्षा केंद्र देण्यात आले असून येथे अनेक विद्यार्थी परीक्षा देत आहेत. मात्र, अनेक विद्यार्थी कॉपी करताना प्रश्न क्रमांकासह उत्तरे घेऊन येत असल्याचे निदर्शनास आले आहे. प्रश्न क्रमांकासह मिळणारी कॉपी परीक्षा केंद्रावर येण्यापूर्वीच पेपर प्राप्त झाल्याची ग्वाही देते. पेपर फूटल्याचा हा एक प्रकार असून अशाप्रकारे येणारी उत्तरे जबाबदार व्यक्तींकडूनच येत असल्याचे समजते.
प्रचलित परीक्षा पद्धतीनुसार विद्यार्थ्यांना उतीर्ण होणे अवघड नाही. बारावीच्या विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्याला प्रत्येक विषयात ७ ते १० गुण प्राप्त झाल्यास तो उतीर्ण होतो. तर कला शाखेच्या विद्यार्थ्यांना १५ ते २० गुण मिळवावे लागतात. असे असतानाही विद्यार्थी कॉपी करीत असल्याने गुणवत्ता ढासळत चालली आहे.
कला शाखेच्या विद्यार्थ्यांना मौखीक परीक्षेचे तर विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना प्रायोगिक परीक्षेचे गुण मिळतात. १५ ते २० गुणाच्या बहुपर्यायी प्रश्नांची उत्तरे विद्यार्थ्यांना सांगण्यात येत असल्यामुळे अनेक विद्यार्थी अभ्यासाकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे काही विद्यार्थी पेपर सुरु होण्यापूर्वीच पेपर माहित करुन सरळ उत्तरे सोबत घेऊन पेपरला बसत असल्याचे पहाडीवरील परीक्षा केंद्रांवर दिसून आले आहे.
या परीक्षा केंद्रावर भरारी पथके कोणतीही कारवाई करताना आढळत नाही. अनेक केंद्रावर मोबाईलचाही सर्रास वापर होत आहे. विद्यार्थी व्हॉट्स अपच्या माध्यमातून सलोखा असणाऱ्या शिक्षकांना प्रश्न पाठवतात आणि उत्तरे परत मागवून परीक्षा केंद्रावर लिहूण नेतात. सोशल मिडीयाचा असा गैरवापर सुरुअसल्याचे सर्रास दिसून येत आहे. (स्थानिक प्रतिनिधी)

पैसे द्या आणि उत्तीर्ण व्हा

कॉपी करुन उतीर्ण होता येत असल्यामुळे वर्षभर अभ्यास करावा लागत नाही. या प्रकरामुळे दरवर्षी कॉपी चालणाऱ्या परीक्षा केंद्रांवर हजारो रुपये शुल्क देऊन प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची रिघ लागलेली असते. मात्र, कडक केंद्र असणाऱ्या शाळांमध्ये नि:शुल्क प्रवेश असतानाही विद्यार्थी मिळत नाही. सर्व परीक्षा केंद्र कॉपीमुक्त केल्यास अशी परिस्थिती निर्माण होणार नाही. यातून विद्यार्थ्यांचीही गुणवत्ता वाढेल आणि विद्यार्थ्यांना अभ्यासाशिवाय पर्याय उरणार नाही. ‘कॉपीमुक्तीकडून गुणवत्तेकडे’ हा प्रयोग अनेक शाळांनी राबविला असताना कॉपी बहाद्दर केंद्रामुळे गुणवत्ता देणाऱ्या शाळांना विद्यार्थ्यांअभावी उतरती कळा लागली आहे.

१५ ते २० हजारात मिळतो प्रवेश
जिवती व कोरपना तालुक्यातील काही नामांकित कॉपीबहाद्दर शाळांमध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थी १५ ते २० हजार रुपये मोजतात. त्यांना उतीर्ण होण्याची हमी देण्यात येत असल्यामुळे शिक्षक विद्यार्थ्यांसाठी वाटेल ते करायला तयार असतात. अशा केंद्रावर बोर्डाचे पथक सुद्धा पोहचत नसल्याने दिसते. चुकून एखाद्या पेपरला बोर्डाचे पथक आले आणि परीक्षेदरम्यान कॉपी न चालल्यास विद्यार्थी संस्थापक किंवा मुख्याध्यापकांना शिवीगाळ करून जातात. कारण विद्यार्थ्यांना १०० टक्के उतीर्ण करण्याची हमी असते.

अधिकाऱ्यांपर्यंत फिल्डींग

कॉपीबहाद्दर शाळांच्या व्यवस्थापनाची व मुख्याध्यापकांची अधिकाऱ्यांपर्यंत फिल्डींग असल्यामुळे इतका मोठा धोका पत्करला जातो. त्यामुळे अधिकारी परीक्षा केंद्रांवर धाड टाकून कॉपी बहाद्दर विद्यार्थ्यांना निलंबित करण्याचे धाडस करताना दिसत नाही.

बोर्डाची परीक्षा की सराव परीक्षा ?

अनेक केंद्रावर बोर्डाच्या परिक्षेसारखे वातावरण नसते. शाळा, महाविद्यालयात नेहमी चालणाऱ्या सराव परिक्षा किंवा घटक चाचण्यासारखी परिस्थिती बघावयास मिळते. परीक्षा गृहात विद्यार्थ्यांचा गोंधळ सुरु असतो. विद्यार्थ्यांच्या बचावात शाळेचे संपूर्ण नेटवर्क व्यस्त असतात. त्यामुळे बोर्डाच्या परीक्षेचे काही महत्व उरले नसल्याचे पहाडीवरील केंद्रावर दिसून येते.

विद्यार्थी येतात उशिरा
बोर्डाने यावर्षीपासून विद्यार्थ्यांना १० मिनिटे अगोदर पेपर देण्याचा निर्णय घेतला आहे. ही १० मिनिटे विद्यार्थ्यांना लिहिण्यासाठी नसून फक्त पेपर वाचण्यासाठी आहे. ११ वाजताच्या पेपरला १० वाजून ३० मिनीटांनी येणारे विद्यार्थी ११ किंवा ११.१० वाजता पेपरला पोहचतात. तोपर्यंत इतर केंद्रावरुन पेपर मिळवून उत्तरे शोधण्याचा प्रयत्न विद्यार्थी करतात.

Web Title: Fearless copper hubs at the center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.