दारूबंदीचे भवितव्य पोलिसांच्या प्रामाणिकतेवर अवलंबून
By Admin | Updated: November 8, 2014 01:01 IST2014-11-08T01:01:44+5:302014-11-08T01:01:44+5:30
चंद्रपूर जिल्ह्यात एक महिन्याच्या आत दारूबंदी करण्याची घोषणा राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर व बल्लारपूर येथील सत्कार सोहळ्यात केली.

दारूबंदीचे भवितव्य पोलिसांच्या प्रामाणिकतेवर अवलंबून
राजुरा: चंद्रपूर जिल्ह्यात एक महिन्याच्या आत दारूबंदी करण्याची घोषणा राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर व बल्लारपूर येथील सत्कार सोहळ्यात केली. त्यांच्या आश्वासनावर जनतेचा विश्वास आहे. दिलेला शब्द ते पाळतात, अशी जनतेत भावना आहे. त्यामुळेच जिल्ह्यातील दारूबंदीसाठी संघर्ष करणाऱ्या हजारो महिला व संघर्षात सहभागी न झालेल्या महिला तसेच दारूच्या व्यसनापासून दूर असलेल्यांमध्ये आनंदाची लाट उसळली आहे. मात्र तसे झाल्यास चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदीचे भवितव्य केवळ पोलिसांच्या प्रामाणिक कर्तव्यावर अवलंबून राहणार आहे.
निकोप समाजासाठी दारूबंदी हिताची आहे. दारूबंदी झाली पाहिजे, असा मतप्रवाह आहे. ग्रामपंचायतस्तरावर जेव्हा दारूबंदीचा निर्णय होतो, तेव्हा मात्र काही महिला इच्छा असूनही दडपणाखाली येऊन भाग घेऊ शकत नाही. ही वस्तुस्थिती आहे. गावात राहणे व दारूवाल्याचा विरोध पत्कारणे बऱ्याच लोकांना महागात पडते. दारू दुकानदार पुरुषांना आपल्या बाजूने ओढण्यासाठी अनेक क्लुप्त्या वापरतात. त्याचा त्रास महिलांना होतो. त्यामुळे महिला हतबल होतात. याच संधीचा फायदा दारू दुकानदार घेतात व दारू बंदीसाठी विरोध करतात.
दारूमुळे आजवर अनेक संसार उद्ध्वस्त झाले आहेत. दारूच्या व्यसनामुळे अनेकांचा अकाली मृत्यू झाला. घरातील पुरुष व्यसनी झाला की, घरची मंडळी त्रस्त होते. त्याचा दुष्परिणाम पत्नी व मुलाबाळांवर होतो. पत्नीच्या कष्टातून मिळालेल्या पैशात दारू पिणारेही कमी नाहीत. त्याला विरोध केल्यास प्रसंगी महिलेला शारिरीक त्रास सहन करावा लागतो.
यावर आळा घालण्यासाठी दारूबंदी होणे आवश्यक आहे. श्रमिक एल्गारच्या संस्थापक अध्यक्ष पारोमिता गोस्वामी यांनी दारूबंदीसाठी गेल्या काही वर्षांपासून संघर्ष सुरू केला आहे. चिमूरमार्गे नागपूरपर्यंत हजारो महिलांचा पायी मोर्चा नेवून तत्कालिन शासनकर्त्यांकडे चंद्रपूर जिल्हा दारूबंदी करण्याची मागणी केली. परंतु शासनकर्त्यांनी महसुलाचा विचार करून ही मागणी प्रलंबीत ठेवली.
यंदा विधानसभा निवडणुकीत चंद्रपूर जिल्ह्यातील मतदारांनी ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या शब्दावर विश्वास ठेवून भाजपाला साथ दिली आणि भाजपाचे सरकार स्थापित होताच ‘दारूबंदी’चा आवाज निघू लागला. ना. मुनगंटीवार यांनीसुद्धा दिलेल्या वचनाचे पालन करीत एक-दिड महिन्यात दारूबंदीचा निर्णय घेण्यात येईल व दारूबंदी निश्चित होणार, याची हमी दिली. त्यामुळे सुमारे दहा वर्षांपासून दारूबंदीचा संघर्ष करणाऱ्यांना आता एका महिन्यात निर्णय मिळणार असल्यामुळे ते सुखावले आहेत. दारूबंदी होणार असल्याची बातमी कळताच, महिलाही उत्साहित झाल्यात. आतातरी चांगले दिवस येतील, असा आत्मविश्वास त्यांच्यात निर्माण झाला आहे.
आजही जिल्ह्यातील अनेक गावांत मोठ्या प्रमाणावर अवैध दारू विक्री सुरू आहे. त्यामुळे पोलीस आपले कर्तव्य कशाप्रकारे पार पाडतात त्यावरच दारूबंदीचा निर्णय सार्थकी ठरणार आहे. (तालुका प्रतिनिधी)