कष्टकरीदादाचा जीवघेणा संघर्ष

By Admin | Updated: December 3, 2014 22:48 IST2014-12-03T22:48:02+5:302014-12-03T22:48:02+5:30

शेतात थंडीत कुडकुडत शेतकरी दिवस- रात्र शेतात राबतो. पिकांच्या रक्षणासाठी वन्यप्राण्यांकडून जीवाला धोका असला तरी काळजातील दु:ख काळजात लपवून प्रसंगी जीवघेण्या संकटाला सामोरे जातो.

The fatal struggle of the oppressed | कष्टकरीदादाचा जीवघेणा संघर्ष

कष्टकरीदादाचा जीवघेणा संघर्ष

प्रकाश काळे - हरदोना
शेतात थंडीत कुडकुडत शेतकरी दिवस- रात्र शेतात राबतो. पिकांच्या रक्षणासाठी वन्यप्राण्यांकडून जीवाला धोका असला तरी काळजातील दु:ख काळजात लपवून प्रसंगी जीवघेण्या संकटाला सामोरे जातो. शेतात जिवापाड कष्ट करणारा शेतकरीदादा आज जीवन मरणाचा संघर्ष करीत आहे. राजुरा तालुक्यातील शेतकऱ्यांकडे बघितले तर याची प्रचिती प्रकर्षाने येते.
सध्या शेतकऱ्यांच्या शेतात वन्यप्राण्यांनी मोठा हैदोस घातला आहे. शेतपिकांना जपण्यासाठी शेतकरीदादाला थंडीत कुडकुडत मचाणीवर उभा राहून राखण करावी लागते. वन्यप्राण्यांकडून जीवाला धोका असला तरी आपल्या व आपल्या कुटुंबाच्या पोटासाठी, पुढील भविष्यासाठी त्याला हे करावे लागते. महाराष्ट्रात कापसाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा,कोरपना, जिवती हे तालुके पांढऱ्या सोन्यासाठी अग्रेसर मानले जातात. यावर्षी तब्बल एक महिना उशिरा पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांना दुबार पेरणीला सामोरे जावे लागले. मात्र हे सारे दु:ख काळजात लपवून बळीराजा शेतीसाठी सज्ज झाला. उत्पादनात वाढ होईल या आशेवर शेतकऱ्यांनी शेतीवर मोठा खर्च केला. सरकारने चार हजार पन्नास रुपये कापूस दर जाहीर करून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली. मात्र दिवस-रात्र कष्ट करणाऱ्या शेतकरीदादाची सरकारला जराही दया आली नाही.
राजुरा तालुका पांढऱ्या व काळ्या सोन्यासाठी अग्रेसर मानला जातो. तालुक्यात मोठ्या प्रमाणात असणाऱ्या कोळसा खाणी देशाच्या नकाशावर असल्यातरी वेकोलिने कोळसा उत्खननानंतर निघालेली माती परिसरात टाकल्याने या मातीवर डोंगराचे स्वरुप प्राप्त झाले आहे. त्यामुळे या ठिकाणी वन्यप्राण्यांचा मोठ्या प्रमाणात वावर असतो. शेतात कापसासोबतच गहु, धान, हरभरा, तूर आदी पीके घेतली जातात. मात्र या परिसरात मोठ्या प्रमाणात रानडुकरांसह वन्यप्राण्यांचे मोठ्या प्रमाणात कळप असल्याने एका रात्रीतून डौलदार पिकांची वाट लावली जात आहे. जंगली जनावरांपासून पिकांच्या बचावासाठी शेतकऱ्यांनी दिवाळीच्या फटाक्याची आतिषबाजी शेतात केली. फटाकच्याच्या आवाजाने जंगली जनावरे पुन्हा शेताकडे फिरकणार नाही, हा शेतकऱ्यांचा समज फसवा निघाला. शेतपिकांशिवाय शेतात खायला काहीच नसल्यामुळे वन्यप्राणी शेतकऱ्यांच्या डोळ्यादेखत पीक उद्धवस्त करीत आहे. त्यासाठी बळीराजाने जिवाची तमा न बाळगता शेतात ‘मचान’ उभारुन शेतपिकांच्या रक्षणासाठी जागल करणे सुरू केले आहे.

Web Title: The fatal struggle of the oppressed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.