कंत्राटी कामगारांचे आमरण उपोषण सुरूच
By Admin | Updated: February 20, 2015 00:46 IST2015-02-20T00:46:20+5:302015-02-20T00:46:20+5:30
चंद्रपूर वीज केंद्रातील एका कंत्राटी कंपनीने २६ कामगारांना कामावरून काढून टाकले. यासंदर्भात कामगार संघटनेने व्यवस्थापनासोबत वाटाघाटी केल्या.

कंत्राटी कामगारांचे आमरण उपोषण सुरूच
दुर्गापूर : चंद्रपूर वीज केंद्रातील एका कंत्राटी कंपनीने २६ कामगारांना कामावरून काढून टाकले. यासंदर्भात कामगार संघटनेने व्यवस्थापनासोबत वाटाघाटी केल्या. मात्र तोडगा निघाला नसल्याने १५ फेब्रुवारीपासून कामगारांनी मेजर गेटलगत मागण्या मान्य होइपर्यंत आमरण उपोषण सुरू केले आहे. गुरुवारीदेखील हे उपोषण सुरूच आहे.
चंद्रपूर वीज निर्मिती केंद्रात कुणाल एन्टरप्राईजेस नावाची एक खासगी कंत्राटी कंपनी आहे. या कंपनीत मागील चार वर्षांपासून कामगार कार्यरत आहेत. यापैकी २६ कामगारांना कंत्राटदाराने १ जानेपासून कामाचे कंत्राट संपल्याचे सांगून कामावरून काढून टाकले. या कामाच्या भरवशावर त्यांचा उदरनिर्वाह सुरू होता. आता यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. एका कामगार संघटनेने या समस्येच्या निराकरणाकरिता कंत्राटदाराशी वाटाघाटी केल्या. मात्र यातून काही एक तोडगा निघाला नाही. अखेर त्यांना आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागला. कामगारांनी १५ फेब्रुवारीपासून चंद्रपूर वीज केंद्राच्या मेजर स्टोअर गेटलगत आमरण उपोषण सुरू केले आहे. दोन उपोषणकर्त्याची प्रकृती खालावल्याने त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयातही दाखल करावे लागले. सध्या येथे तीन कामगार आमरण उपोषणास बसले आहेत.
कामगार संघटनेने चंद्रपूर येथील कामगार आयुक्ताकडेही तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणाच्या सुनावणीसाठी कामगार संघटना, वीज व्यवस्थापन व कंत्राटदाराला १२ फेब्रुवारीला कार्यालयात बोलाविले होते. त्या दिवशी कंत्राटदार व वीज व्यवस्थापन गैरहजर होते. परत त्यांना २४ फेब्रुवारी ही तारीख देण्यात आली आहे. याकडे कामगारांचे लक्ष लागले आहे. रास्त मागण्या मान्य योईपर्यंत हे आमरण उपोषण चालणार असून वेळप्रसंगी कामगार आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही कामगारांनी दिला आहे. (वार्ताहर)