गतिमान व पारदर्शी प्रशासनाला प्रथम प्राधान्य

By Admin | Updated: May 20, 2016 00:59 IST2016-05-20T00:59:57+5:302016-05-20T00:59:57+5:30

प्रशासनाचा गाडा सुरळीतपणे हाकून सर्वसामान्य माणसांच्या प्रश्नांची सोडवणूक करणे ही शासनाची अधिकाऱ्यांकडून अपेक्षा असते.

Fast and transparent administration is the first priority | गतिमान व पारदर्शी प्रशासनाला प्रथम प्राधान्य

गतिमान व पारदर्शी प्रशासनाला प्रथम प्राधान्य

आशुतोष सलील : नव्या जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केला मनोदय
चंद्रपूर : प्रशासनाचा गाडा सुरळीतपणे हाकून सर्वसामान्य माणसांच्या प्रश्नांची सोडवणूक करणे ही शासनाची अधिकाऱ्यांकडून अपेक्षा असते. ते कर्तव्य चोखपणे बजावताना गतीमान अणि पारदर्शी प्रशासनाला प्रथम प्राधान्य देण्यावर आपला भर असेल. या सोबतच, लोकाभिमुख प्रशासनातून जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी आपली यंत्रणा कार्यरत असेल, असा मनोदय चंद्रपूर जिल्ह्याचे नवे जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी व्यक्त केला.
वर्धा येथून जिल्हाधिकारी पदावर नव्याने बदलून आल्याच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी भेट घेवून चर्चा केली असता ते बोलत होते. यापूर्वी चंद्रपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत असतानाचा येथील अनुभव पाठिशी घेवून आता जिल्हाधिकारी म्हणून परतलेले आशुतोष सलील उत्साही दिसले. ते म्हणाले, बदलीचा आदेश घेवून चंद्रपूरच्या प्रवासाठी निघालो तेव्हाच पुढची तीन वर्षे फक्त चंद्रपूर डोक्यात ठेवायचे, हे मनाशी ठरवूनच येथे पोहचलो. जनतेच्या आपणाकडून अपेक्षा बऱ्याच असल्याने जरा दडपण आल्यासारखे वाटत आहे. मात्र सर्वांच्या सोबतीने प्रशासकीय कार्यातून नवी पाऊलवाट निर्माण करण्याचा प्रयत्न करणार असल्याचा त्यांचा निर्धार दिसला. अधिकाऱ्यांच्या टेबलवर फाईल रेंगाळण्याच्या प्रकाराबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. ते म्हणाले, यामुळे वेळेचा अपव्यय आणि जनतेला नाहक त्रास होतो. ही अवस्था पालटण्यासाठी आणि गतीमान पारदर्शी प्रशासन आणण्यासाठी ‘फाईल ट्रॅकींग’ पद्धत अंमलात आणण्याचा विचार आहे. कार्यालयात एकूण किती फाईली आहेत, कुण्या अधिकाऱ्यांकडे किती फाईली केव्हापासून पेंडिंग आहेत आणि त्यांची स्थिती काय आहे, हे संगणकीय प्रणालीच्या माध्यामातून चटकन कळावे, अशी व्यवस्था असेल. आपली फाईल नेमकी कोणत्या टेबलवर कोणत्या कारणासाठी अडून आहे, हे संबंधितांना कळण्याचीही व्यवस्था यातून अंमलात आपली जाणार आहे.

जनतेच्या मदतीसाठी उभे राहणार ‘सेवादूत’
अधिकाऱ्यांच्या मानसिकतेमुळे बरेचदा सर्वसामान्यांची कामे अडतात. अनेकदा सर्वसामान्य जनतेला शासकीय कार्यपद्धतीबद्दल माहिती नसते. त्यामुळे वाद होतात. प्रकरणे रेंगाळतात, त्यावर उपाय म्हणून तहसील कार्यालय स्तरावर सेवादुतांची नियुक्ती करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. हे सेवादूत निर्धारित दिवशी दिवसभर कार्यालयात उपस्थित राहून नागरिकांना योग्य मार्गदर्शन करतील. या सोबतच, तालुका कार्यालयात चलचित्रफितींच्या माध्यमातूनही मार्गदर्शन केले जाईल. वर्धा जिल्ह्यात नेहरू युवा केंद्राच्या माध्यमातून आपण नागरिकांच्या समस्यांचे सर्व्हेक्षण याच योजनेच्या अंमलबजावणीच्या उद्देशान केले होते. चंद्रपूर जिल्ह्यात ‘सेवादूत’ योजना राबविताना त्या माहितीचा योग्य उपयोग होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Web Title: Fast and transparent administration is the first priority

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.