शोकाकूल वातावरणात फारूखचा दफनविधी
By Admin | Updated: May 15, 2017 00:44 IST2017-05-15T00:44:13+5:302017-05-15T00:44:13+5:30
नागभीड तालुक्यातील किटाळी-खरकाडा जंगलात शनिवारी अस्वलाने केलेल्या हल्ल्यात मरण पावलेल्या...

शोकाकूल वातावरणात फारूखचा दफनविधी
अस्वलाच्या हल्ल्यात ठार : खरकाडावर पसरली शोककळा
लोकमत न्यूज नेटवर्क
तळोधी (बा) : नागभीड तालुक्यातील किटाळी-खरकाडा जंगलात शनिवारी अस्वलाने केलेल्या हल्ल्यात मरण पावलेल्या फारूख युसूफ शेखच्या तरुणाचा दफनविधी अत्यंत शोकाकूल वातावरणात त्याच दिवशी रात्री १ वाजता पार पडला. हातावर पोट असलेल्या कुटुंबातील कमावता तरुण अचानक मरण पावल्याने खरकाडा गावावर शोककळा पसरली आहे. अस्वलाच्या हल्ल्यात तिघांचा मृत्यू झाला असून वन विभागाने तिन्ही मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५० हजार रुपयांची तत्काळ मदत उपलब्ध केली आहे.
घरातील कर्ता पुरूष फारूख शेख तळोधी (बा.) वनपरिक्षेत्रातील कंपार्टमेन्ट क्रमांक ९५ ह्या भागात तेंदूपत्ता तोडण्याकरिता गेला होता. यावेळी पिसाळलेल्या अस्वलाने अचानक तेंदूपत्ता तोडणाऱ्या मजुरावर हल्ला केला. यावेळी खरकाडी येथील मजूर पितांबर नारायण वाघाडे, सदाशिव नारायण वाघाडे, सचिन प्रकाश सडमाके व ताराचंद महादेव नेवारे आदी फारूख शेखसोबत होते. मात्र जीव वाचविण्यासाठी सर्वजण सैरावैरा पळू लागले. या हल्ल्यात फारूख शेख जीव वाचविण्याकरिता झाडावर चढला. तो झाडावर असताना अस्वलाने झाडावर चढून फारूखचा पाय ओढून खाली पाडले आणि त्याच्यावर प्रतिहल्ला करून गंभीर जखमी केले.
फारूखचा जीव वाचविण्यासाठी खरकाडा येथील गावकरी चंद्रपूरला उपचाराकरिता घेऊन जात होते. त्यावेळी रस्त्यातच त्याची प्राणज्योत मालवली. मृत्यूची बातमी आलेवाही (खरकाडा) येथील गावकऱ्यांना माहिती होताच सर्वत्र शोककळा पसरली. रात्रभर खरकाडा येथील गावकऱ्यांनी अश्रू पुसत शेख कुटुंबीयांना सांत्वना दिली. फारूखचा मृतदेह मध्यरात्रीला गावात आणण्यात आला. तेवढ्याच रात्री त्याची अंत्ययात्रा खरकाडा या गावावरून आलेवाही येथील कब्रस्थानात नेण्यात आली. यावेळी सर्व खरकाडा गाव झाले होते. तेथे फारूख शेख याचा मृतदेह पुरण्यात आला.
सात किमीवरील कब्रस्तानात अंत्यविधी
आलेवाही गटग्रामपंचायत अंतर्गत खरकाडा येथे मुस्लीम समाजाचे १० कुटुंब असून त्यांच्यासाठी या गावात कब्रस्तान नसल्याने आलेवाही येथील सात किलोमीटर अंतरावरील कब्रस्तानात दफन विधी करावी लागत असतो. शासनाने खरकाडा येथील मुस्लीम समाजाला कब्रस्थानाची जागा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात येत आहे.
अस्वलाच्या हल्ल्यातील जखमींवर नागपुरात उपचार
नागभीड : ब्रह्मपुरी वन विभागाअंतर्गत येणाऱ्या वनपरिक्षेत्रातील किटाळी जंगलात अस्वलाने शनिवारी सकाळी हल्ला चढविला. त्यात तिघांचा मृत्यू होऊन तिघे गंभीर जखमी आहेत. गंभीर जखमींवर नागपूर येथे उपचार सुरू असून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती आहे. दरम्यान, या हल्ल्यात ठार झालेल्या तिघांवर शनिवारी सायंकाळी अतिशय शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेली रंजना अंबादास राऊत ही महिला जागीच ठार तर बिसन सोमा कुळमेथे व फारूख युसुफ शेख यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मीना दुधराम राऊत, सचिन बिसन कुळमेथे व कुणाल दुधराम राऊत हे गंभीर जखमी झाले आहेत. या तिघांवरही आता नागपूर येथे उपचार सुरू असून त्यांचेवर आवश्यक शस्त्रक्रियसुद्धा करण्यात आली. आता त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती आहे.ज्या अस्वलाने हल्ला करून तिघांना ठार तर तिघांना गंभीर जखमी केले त्या अस्वलाला वन विभागाच्या शूटरने गोळ्या घालून ठार केले. त्या अस्वलाचा रविवारी ब्रह्मपुरीच्या वनकार्यालयात शवविच्छेदन करण्यात आले. डॉ. रविकांत खोब्रागडे यांनी हे शवविच्छेदन केले.
अस्वलाच्या हल्ल्यात मृत पावलेल्यांची संख्या तीन आहे. तिघे गंभीर जखमी आहेत. त्यांच्यावर नागपूर येथे उपचार सुरू आहे. त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. वनविभागाचे कर्मचारी जखमींसोबत आहेत. मी जखमींच्या नातेवाईक व वन कर्मचाऱ्यांच्या संपर्कात आहे.
- अभिलाषा सोनटक्के, वनपरिक्षेत्राधिकारी, तळोधी (बा)