पावसाच्या दडीमुळे शेतकरी चिंतातूर

By Admin | Updated: September 8, 2016 00:39 IST2016-09-08T00:39:41+5:302016-09-08T00:39:41+5:30

यावर्षी पुन्हा वरूणराजा शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू देणार की काय, असे वाटायला लागले आहे.

Farmers worry because of rainy rains | पावसाच्या दडीमुळे शेतकरी चिंतातूर

पावसाच्या दडीमुळे शेतकरी चिंतातूर

पिकांवर रोगराई : हातचे पीक पुन्हा हातून जाणार काय ?
चंद्रपूर : यावर्षी पुन्हा वरूणराजा शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू देणार की काय, असे वाटायला लागले आहे. मागील दोन वर्ष सतत नुकसानीला सामोरे जाणारा शेतकरी यावेळी खरीप हंगामाकडून मोठी आशा बाळगून आहे. पावसाळ्याच्या प्रारंभी शेतकऱ्यांना प्रफुल्लित करणारा पाऊस मागील तीन आठवड्यापासून गायब आहे. जवळजवळ सर्वच धान उत्पादकांची रोवणी झाली आहे.पिकांना आता पावसाची नितांत आवश्यकता आहे. सोयाबीन आणि कापसालाही पाणी हवे आहे. मात्र पाऊस पडणे तर सोडाच; उलट उन्हाळ्यासारखे तिव्र ऊन तापत असल्याने पिकांचे हाल वाईट आहे.
खरीप हंगामाला जुलै महिन्यातच सुरूवात झाली आहे. शेतकऱ्यांनी हंगामपूर्व मशागतीची कामे करीत असतानाच बि-बियाणांची जुळवाजुळव करणे सुरू केले होते. यावर्षी खरीप हंगामात भात, ज्वारी, तृणधान्य, तूर, मुंग, उडीद, कडधान्य, अन्नधान्य, भुईमुंग, तीळ, सोयाबीन, एरंडी, गळीतधान्य, कापूस, ऊस पीक पेरणीचे नियोजन कृषी विभागाने केले होते. खरीप हंगामात चार लाख ७७ हजार ६५५ हेक्टरवर लागवडीचा कृषी विभागाचा अंदाज होता. प्रारंभी पावसाचे चांगले आगमन झाल्याने कमी-अधिक प्रमाणात अंदाजाप्रमाणे पेरणीही झाली.
गेल्या दोन वर्षात नुकसानीला सामोरे जाऊन शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. मात्र शेतकरी अद्यापही खचलेला नसून नव्या जोमाने तयारीला लागला होता. यावर्षी तरी निसर्ग आपल्याला साथ देईल, अशी आस शेतकरी बाळगून आहे. गतवर्षी शेतकऱ्यांनी पेरणी केल्यानंतर पावसाने दडी मारली होती. त्यामुळे अनेकांना दुबार पेरणी करावी लागली होती. दुबार पेरणी करताना पुन्हा पावसाने हजेरी लावली. मात्र त्यानंतर पुन्हा पाऊस गायब झाला. पावसाचा हा लहरीपणा सातत्याने कायम राहिला. मागील वर्षीच्या खरीप हंगामात अनेकांना पाहिजे तसे उत्पन्न मिळू शकले नाही. तरीही काही जणांनी शेतपिक कसेबसे पिकविले. मात्र मिळालेले उत्पन्न कर्जाचे ओझे हलके करू शकले नाही.
हवामान खात्याने यावर्षी सुरुवातीपासूनच चांगला पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली असल्याने शेतकऱ्यांत आनंद होता. मान्सूनच्या आगमनानंतर काही दिवस समाधानकारक पाऊस पडल्याने शेतकरीवर्ग निश्चिंत होता. जुलै महिन्यात संततधार पाऊस झाल्यामुळे जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पात, नदी-नाल्यांमध्ये बऱ्यापैकी पाणी जमा झाले. एवढेच नव्हेतर शेतकऱ्यांच्या शेतातही पाणी जमा झाले. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना पेरणी करण्यासाठी विलंब झाला. त्यानंतर मात्र पावसाने उघाड दिला. जमीन वाळल्यानंतर जिल्ह्यात पेरण्यांची लगबग सुरू झाली. जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी महागडे बि-बियाणे घेऊन शेतात पेरले. त्यानंतर पुन्हा एक-दोनदा दमदार पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांनी रोवणीची कामेही आटोपली. पिकेही चांगले भरात आली. मात्र त्यानंतर पावसाने दडी मारली. चांगले तीन आठवडे पावसाने तोंडच दाखविले नाही. एवढा दीर्घ काळ पाऊस न आल्याने पिकांची अवस्था वाईट होत आहे. काही दिवस मध्येच ढगाळ वातावरण होत राहिले. त्यामुळे पिकांवर विविध रोगांचे सावट निर्माण झाले आहे.
आता पिकांना पावसाची खरी गरज आहे. पावसाचा हा शेवटचा महिना आहे. या महिन्यात पाऊस बरसला नाही तर पुन्हा दुष्काळसदृश्य स्थिती निर्माण होणार आहे. त्यामुळे शेतकरी चिंतातूर झाला आहे. (शहर प्रतिनिधी)

नदी-नाल्यातीलही जलस्तर घटला
जुलै महिन्यात संततधार व आॅगस्ट महिन्यात एक-दोनदा दमदार पाऊस झाल्यामुळे जमिनीतील पाण्याची पातळी वाढून नदी-नाल्यांमध्ये बऱ्यापैकी पाणी जमा झाले होते. मात्र त्यानंतर तीन आठवड्यापासून पाऊस गायब आहे. सोबतच उन्हाळ्यासारखे ऊन तापत आहे. यामुळे नदी-नाल्यातील जलस्तर आटत चालला आहे.

धानावर अळींचा हल्ला
काही दिवसांपूर्वी ढगाळ वातावरण होते. यासोबतच सध्या आर्द्रताही खूप वाढली आहे. त्यामुळे धान पिकांवर पाने खाणाऱ्या अळींचे आक्रमण झाले आहे. ही अळी पिकांचा फडशा पाडत असल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहे. धानापाठोपाठ इतर पिकांवरही विविध किडींचा प्रादुर्भाव झाला आहे. या रोगांपासून पिकांना वाचविण्यासाठी शेतकरी कसोशिने प्रयत्न करीत आहेत. मात्र पावसाच्या अभावामुळे त्यांचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरत आहेत.

Web Title: Farmers worry because of rainy rains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.