सास्ती : शेतकऱ्याचे संपूर्ण पीक घरात येईपर्यंत चांगले पिक झाले, असे विश्वासाने सांगता येणे सद्यस्थितीत कठीण झाले आहे. शेतकरी दादा कुण्या ना कुण्या संकटात सापडून त्याचे सर्व बाजूने नुकसानच होताना दिसून येत आहे. कधी जास्त पाऊस आल्याने तर कधी कमी पाऊस आल्याने नुकसान, कधी लष्करी अळी तर कधी गारपीट, याव्यतिरिक्त आता शेतकऱ्यांपुढे नवे संकट उभे झाले आहे. शेतातील उभे पीक तर सोडाच पण कापणी करुन ठेवलेल्या पिकावरसुद्धा रानटी जनावरांनी हल्ला चढवून नुकसान करणे सुरू केले आहे. त्यामुळे पिकाच्या रक्षणासाठी शेतकऱ्यांला थंडीतही अख्खी रात्र जागून काढावी लागत आहे.कृषिप्रधान देशातील शेतकरी कायमच संकटात सापडलेला दिसून येत आहे. यामुळेच शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. शेतकरी अहोरात्र काबाडकष्ट करुन उत्पन्न वाढविण्याच्या प्रयत्नात असतो. परंतु निसर्गाच्या प्रकोपापुढे त्याचे काहीच चालत नाही. कुण्या ना कुण्या कारणाने त्याला अपयशच येत असते. शासनही शेतकऱ्यांसाठी बऱ्याच सोईसुविधा उपलब्ध करुन देते. परंतु त्याचाही फायदा होत नाही. शेतकरी दादा नेहमीच संकटात सापडून हवालदील झालेला असतो.पिकाच्या पेरणीपासूनच त्याला संकटाला समोरे जावे लागते. मशागतीनंतर पावसाअभावी पेरण्या खोळंबतात. कशाबशा पेरण्या झाल्या की पाऊस बेपत्ता झाल्याने दुबार पेरणीचे संकट येते. पेरणी झालीच तर मोठा पाऊस होऊन नुकसान होण्याची शक्यता असते. या सर्व संकटातून सावरतो न सावरतो तोच लष्करी अळी किंवा इतर रोगांमुळे नुकसान सुरु होते. हे सर्व झाल्यावर अकाली पाऊस, गारपीट याची भीती असते. याव्यतिरिक्त परिसरातील प्रदूषणामुळे शेतीचे नुकसान होते. या सर्व संकटातून पिकाचे रक्षण करता करता शेतकरी पूर्णत: खचून जातो. परंतु त्याचे संकट काही संपल्या संपत नाही. या सर्व संकटानंतर येणारे संकट म्हणजे रानटी जनावरांचा धुमाकूळ. उभ्या पिकावर हल्ला करुन पिकाचे नुकसान केले जात आहे. पिकांची कापणी करुन शेतात ठेवलेल्या पिकावरही हल्ला सुरु आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्याने शेतकरी दादा कडाक्याच्या थंडीतही आपल्या शेतातील पिकांचे रक्षण करण्याकरिता अख्खी रात्र जागून काढत आहे.जंगल क्षेत्र लागून असलेल्या शेतात जर जीव धोक्यात घालून रक्षण करावे लागते. पिकाच्या रक्षणासाठी शेतात थंडीत अख्खी रात्र जागावी लागते. जंगली जनावरे अन्न व पाण्याच्या शोधात गावाकडे धाव घेऊन शेतात असलेल्या पिकावर हल्ला करुन आपले पोट भरण्यापेक्षा नुकसान जास्त करीत आहे. कापून ठेवलेल्या धानाच्या गंजीवर हल्ला करुन नुकसान केले जात आहे. शेतकऱ्यांच्या समस्यांकडे मात्र प्रशासन लक्ष देत नाही. जनावरांच्या हल्ल्यामुळे झालेल्या नुकसानीची भरपाईसुद्धा मिळत नाही. किंवा यावर नियंत्रण म्हणून कोणतीही उपाययोजना केली जात नाही, हे विशेष. (वार्ताहर)
पिकासाठी रात्रभर जागतात शेतकरी
By admin | Updated: November 8, 2014 01:00 IST