सिंचनाची सोय नसल्याने शेतकरी संकटात - सतीश वारजूकर
By Admin | Updated: March 19, 2016 00:48 IST2016-03-19T00:48:52+5:302016-03-19T00:48:52+5:30
गोसेखुर्द धरणाचे मोखाबडी उपसा कालव्याद्वारे पाणी चिमूर तालुक्यात मिळावे म्हणून चार-पाच वर्षापूर्वी कॅनल तयार केले.

सिंचनाची सोय नसल्याने शेतकरी संकटात - सतीश वारजूकर
भिसी : गोसेखुर्द धरणाचे मोखाबडी उपसा कालव्याद्वारे पाणी चिमूर तालुक्यात मिळावे म्हणून चार-पाच वर्षापूर्वी कॅनल तयार केले. परंतु आजही कॅनल त्याच अवस्थेत आहेत. पाणीही आले नाही. कालव्याचे काम पूर्ण झाले नाही. यासाठी जबाबदार व्यक्तीवर कारवाई झालीच पाहिजे. परंतु चिमूर तालुक्यात शेती सिंचनाची सोय नसल्याने नेहमी शेतकऱ्यांवर संकट येऊन त्यांचे जीवनमान ढासळत आहे. त्यासाठी त्यांना आधार देणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य डॉ. सतीश वारजूकर यांनी केले.
सांस्कृतिक भवन भिसी येथे भिसीतील विविध विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चिमूर तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष माधव बिरजे होते. उद्घाटक डॉ. अविनाश वारजूकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून व्यासपीठावर प्रा. राम राऊत, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संजय डोंगरे, काँग्रेस ज्येष्ठ नेते पंजाबराव गावंडे, घनश्याम डुकरे, दिनेश गावंडे, प्रफुल्ल खापर्डे, ओमजी खैरे, शेषराव भुरके, कादरबाबू शेख, अॅड. अरुण दुधनकर, कदीर शेख व इतर मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी तुषार सूर्यवंशी यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम पार पडला.
त्यानंतर डॉ. अविनाश वारजूकर व डॉ. सतीश वारजूकर यांच्या हस्ते विविध कामांचे लोकार्पण झाले. तसेच प्रस्तावित कामांचे भूमीपूजन करण्यात आले.
याप्रसंगी कादरबाबू शेख, प्रा. राम राऊत, संजय डोंगरे, डॉ. अविनाश वारजूकर यांची भाषणे झालीत. (वार्ताहर)