कृषिशास्त्रज्ञांकडून शेतशिवाराची पाहणी

By Admin | Updated: October 20, 2015 01:20 IST2015-10-20T01:20:33+5:302015-10-20T01:20:33+5:30

तालुका कृषी अधिकारी पोंभुर्णा यांच्या वतीने जिल्हा मासिक चर्चासत्र व प्रक्षोभ भेटीचे आयोजन करण्यात आले. या

Farmers survey of agricultural experts | कृषिशास्त्रज्ञांकडून शेतशिवाराची पाहणी

कृषिशास्त्रज्ञांकडून शेतशिवाराची पाहणी

पोंभुर्णा : तालुका कृषी अधिकारी पोंभुर्णा यांच्या वतीने जिल्हा मासिक चर्चासत्र व प्रक्षोभ भेटीचे आयोजन करण्यात आले. या प्रक्षोभ भेटीच्या कार्यक्रमात चंद्रपूरचे कृषी सहसंचालक तपस्कर, डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोलाचे कृषिशास्त्रज्ञ डॉ.नेहारकर आणि चंद्रपूर जिल्ह्यातील १५ तालुक्यातील तालुका कृषी अधिकारी उपस्थित होते. त्यांनी यावेळी पोंभुर्णा तालुक्यातील डोंगरहळदी व केमारा येथील शेतशिवाराला भेट देऊन पाहणी केली.
यावेळी डोंगरहळदी येथील जलयुक्त शिवार अभियानांतर्गत पूर्ण करण्यात आलेले शेततळे आणि त्यातून धानपिकाला मिळणारे पाणी या संपूर्ण बाबीची संबंधित अधिकाऱ्यांनी पाहणी केली. दरम्यान येथील लाभार्थी शेतकरी कवडू कन्नाके व सोनु आत्राम यांनी अधिकाऱ्यांशी बोलताना सांगितले की, यापूर्वी हा परिसर कोरडवाहू क्षेत्र असल्याने आणि याठिकाणी सिंचनाची सोय नसल्याने केवळ निसर्गावर अवलंबून शेती व्यवसाय करावा लागत होता. त्यामुळे अनेकदा धानपीक हाती लागत नव्हते. सततच्या नापिकीमुळे आमच्यावर कर्जाचे डोंगर वाढत जायचे.
परंतु कृषी विभागाच्या जलयुक्त शिवार या योजनेमुळे तालुका कृषी अधिकारी भाष्कर गायकवाड यांच्या प्रयत्नातून आमच्या शेतीमध्ये शेततळे झाल्याने आम्हाला नवसंजीवनी मिळाली आहे. आज आमचे धानपिक सिंचनाच्या पुरेशा सोयीमुळे बहरले असल्याचे अधिकाऱ्यांना सांगितले तर यावरच न थांबता उर्वरित शेततळ्यातील पाण्यावर कांदा व भाजीपाला पिकाचे उत्पादन घेऊन कुटुंबात आर्थिक भर निर्माण करण्यात येणार असल्याचे मत सुद्धा प्रगट केले. बांधावर बहरलेल्या तुर पिकामुळे वर्षभर कुटुंबाला डाळीचा उपयोग होणार असल्याचेसुद्धा सांगितले.
यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी केमारा व डोंगरहळदी येथील शेतकऱ्यांच्या धानपिकावर विविध रोगांनी आक्रमण केलेल्या शेतांची पाहणी केली. यामध्ये कडपा, कडाकरपा, खोडकिडा तसेच तुडतुडे या किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आढळून आला. यावर नियंत्रक उपाय म्हणून उपस्थित असलेले कृषिशास्त्रज्ञ डॉ.नेहारकर यांनी संबंधित शेतकऱ्यांना उपाययोजनेविषयी मार्गदर्शन केले. या प्रक्षोभ भेटीच्या कार्यक्रमात गिरीधरसिंह बैस, नीळकंठ नैताम व इतर शेतकरी उपस्थित होते.
प्रक्षोभ भेटीच्या कार्यक्रमानंतर पोंभुर्णा येथील पंचायत समितीच्या सभागृहात चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले.
यावेळी चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व तालुका कृषी अधिकारी यांनी तालुक्यातील विविध पिकांवर येणारे रोग व किडीबाबत अहवालाचे वाचन केले. पिकांवर येणाऱ्या विविध रोग व किडीवर नियंत्रण व उपचाराबाबत कृषिशास्त्रज्ञ डॉ.नेहारकर तसेच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी चंद्रपूरचे डॉ.हसनाबादे यांनी उपस्थितांना सविस्तर मार्गदर्शन केले.
सदर चर्चासत्राच्या कार्यक्रमाचे संचालन तालुका कृषी अधिकारी भास्कर गायकवाड यांनी तर आभार मंडळ कृषी अधिकारी विजय काळे यांनी मानले.
सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कृषी पर्यवेक्षक नगराळे, कृषी सहायक डोंगरे व टोंगलवार यांनी परिश्रम घेतले. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Farmers survey of agricultural experts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.