शेतशिवारातील अपूर्ण पांदण रस्त्यामुळे शेतकरी त्रस्त

By Admin | Updated: February 1, 2016 01:10 IST2016-02-01T01:10:09+5:302016-02-01T01:10:09+5:30

तालुक्यातील देवाडा खुर्द येथील ग्रामपंचायत अंतर्गत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत तयार

Farmers suffer because of the unfinished pawn road in the farmland | शेतशिवारातील अपूर्ण पांदण रस्त्यामुळे शेतकरी त्रस्त

शेतशिवारातील अपूर्ण पांदण रस्त्यामुळे शेतकरी त्रस्त

पोंभुर्णा : तालुक्यातील देवाडा खुर्द येथील ग्रामपंचायत अंतर्गत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत तयार करण्यात आलेला तीन किलोमीटरचा पांदण रस्ता गेल्या चार वर्षापासून अपूर्ण आहे. स्थानिक शेतशिवारातील शेतकऱ्यांना आपली शेतीवियषक कामे करण्यास अनेक अडचणीला सामोरे जावे लागत आहे.
स्थानिक देवाडा खुर्द ग्रामपंचायत अंतर्गत सन २०११ मध्ये रामपूर दीक्षित येथील शेतशिवारामध्ये तीन किलोमीटरचा पांदण रस्ता महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत मंजूर करण्यात आला. या रस्त्यावर शासनाचे लाखो रुपये खर्च करून मजुरांमार्फत मातीकाम करण्यात आले. परंतु सदर रस्ता मात्र चार वर्षे होऊनसुद्धा अपूर्णच ठेवण्यात आल्याने शासनाच्या लाखो रुपयांच्या निधीचा चुराडा झाला असल्याचे नागरिकांकडून बोलले जात आहे.
ग्रामीण शेतकऱ्यांना त्यांच्या शेती व्यवसायात काम करण्यासाठी अडचणी निर्माण होणार नाही. त्यामुळे शासनाद्वारे मरेगा अंतर्गत प्रत्येक क्षेत्रात पांदण रस्त्याची निर्मिती केली जात आहे.
परंतु येथील तालुका प्रशासन मात्र शेतकऱ्यांना सोयी-सुविधा निर्माण करून देण्यास असमर्थ ठरत आहे. स्थानिक प्रशासनाच्या या उदासीन धोरणामुळे येथील शेतकऱ्यांचे स्वप्न क्षणभंगुर ठरल्याचे चित्र या परिसरात पाहायला मिळत आहे. सततच्या नापिकीमुळे व उत्पादन खर्चाच्या तुलनेत पाहिजे त्या प्रमाणात भाव मिळत नसल्याने ग्रामीण भागातील शेतकरी तुर्तास हतबल होवून कर्जाच्या ओझ्याखाली दबला जात आहे. यासाठी शासनाकडून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्याचे उद्दिष्ट समोर ठेवून ग्रामीण भागात शेतकऱ्यांसाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. परंतु त्याचा लाभ शेतकऱ्यांना मिळतो किंवा नाही याची साधी पाहणीसुद्धा वरिष्ठांकडून केली जात नसल्याने अनेक ठिकाणी शासनाच्या लाखो रुपयांच्या निधीचा अपव्यय होत आहे.
पोंभुर्णा पंचायत समिती व तालुका स्तरावर अनेकदा महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामाबाबत बैठका होत असतात. मग त्यामध्ये देवाडा खुर्द येथील अपूर्ण रस्त्याच्या कामाबाबत माहिती नसावी का, असा प्रश्न अन्यायग्रस्त शेतकऱ्यांकडून केला जात आहे. या अपूर्ण रस्त्यामागे नेमके काय कारण असावे, याची वरिष्ठ अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांनी दखल घेवून या कामात दिरंगाई करणाऱ्या संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी व स्थानिक शेतकऱ्यांचा शेतीविषयक अडचण निर्माण होणारा अपूर्ण पांदण रस्ता पूर्ण करण्यात यावा, अशी येथील शेतकऱ्यांची मागणी आहे. या रस्त्याबाबत स्थानिक शेतकऱ्यांनी अनेकदा अपूर्ण रस्त्याचे काम पूर्ण करण्याबाबत निवेदन दिले आहेत. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Farmers suffer because of the unfinished pawn road in the farmland

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.