शेतजमिनीच्या मालकी हक्कासाठी शेतकऱ्याचा संघर्ष
By Admin | Updated: February 7, 2016 02:01 IST2016-02-07T02:01:41+5:302016-02-07T02:01:41+5:30
स्वत:च्या शेतजमिनीचा मालकी हक्काचा सातबारा असुनसुद्धा काही अतिक्रमणधारकांनी त्या जागेवर कब्जा केल्याने मूळ शेतकऱ्याला मालकी हक्काच्या ...

शेतजमिनीच्या मालकी हक्कासाठी शेतकऱ्याचा संघर्ष
अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष : २० वर्षांपासून झिजवत आहेत शासकीय उंबरठे
पोंभुर्णा : स्वत:च्या शेतजमिनीचा मालकी हक्काचा सातबारा असुनसुद्धा काही अतिक्रमणधारकांनी त्या जागेवर कब्जा केल्याने मूळ शेतकऱ्याला मालकी हक्काच्या शेतजमिनीवर वहीवाट करून उत्पादन घेण्यापासून मुकावे लागत आहे. देवाडा खुर्द येथील रामपूर दीक्षित शेतशिवारामध्ये हा प्रकार घडला आहे.
पोंभुर्णा तालुक्यातील देवाडा (खुर्द) येथील रामपूर दीक्षित शेतशिवारामध्ये जामतुकूम येथील शेतकरी शंकर कोसमशिले यांना सर्वे नं. ११/१ मध्ये सन ९५-९६ मध्ये शासनाकडून २.६७ हे.आर. जागेचा पट्टा मिळाला. त्यांच्या वडिलोपार्जीत या शेतजमिनीवर भलत्याच व्यक्तीने अतिक्रमण करून तो त्यात उत्पादन घेत आहे. मुळ शेतकरी आपल्या जागेवर वहिवाट करण्यास गेला असता अतिक्रमणधारकाने त्याला मारहाण केली. संबंधित शेतकरी कायदेशिर मार्गाचा अवलंब करून २० वर्षापासून शासन दरबारी हेलपाटे मारून संघर्ष करीत आहेत. संबंधित अतिक्रमणधारक हे सत्ताधारी पक्षाच्या एका कार्यकर्त्याच्या निकटवर्तीय असल्याने शासकीय स्तरावरून त्यांना न्याय मिळणे कठिण झाले आहे.
सन १९९५-९६ पासून त्यांना शासनामार्फत दुष्काळग्रस्त निधी व पुरग्रस्त निधीचा लाभ मिळत आहे. परंतु स्वत:ची जमिन कसून उत्पादन घेण्याचा अधिकार मात्र २० वर्षाचा संघर्ष करूनही मिळाला नाही. याबाबत अन्यायग्रस्त शेतकऱ्याने तलाठी, तहसील कार्यालय, भूमि अभिलेख कार्यालयाचे उंबरठे झिजवित आहेत. परंतु अजुनही त्याला शासनाकडून न्याय मिळाला नाही. यासंदर्भात प्रशासनाला वारंवार विनंत्या अर्ज करूनही प्रशासकीय अधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. (तालुका प्रतिनिधी)