शेतकऱ्याचे चूल बंद आंदोलन सुरू
By Admin | Updated: June 5, 2017 00:22 IST2017-06-05T00:22:53+5:302017-06-05T00:22:53+5:30
राज्यभरात शेतकऱ्यांचा असंतोष उफाळून आल्याने शेतकरी संपावर गेले आहे.

शेतकऱ्याचे चूल बंद आंदोलन सुरू
तहसीलदारांना निवेदन : भद्रावती तालुक्यातील शेतकऱ्यांचा संपात सहभाग
लोकमत न्यूज नेटवर्क
भद्रावती : राज्यभरात शेतकऱ्यांचा असंतोष उफाळून आल्याने शेतकरी संपावर गेले आहे. या संपाबाबत सर्वत्र संभ्रम निर्माण केला जात असला तरी भद्रावती तालुक्यातील शेतकरी बांधव या संपात सहभागी होत असल्याचे निवेदन विविध संघटनांकडून तहसीलदारांना दिले आहे. या संपाला पाठिंबा म्हणून वडेगाव येथील माधव जीवतोडे या शेतकऱ्याने तर आज रविवारपासून आपली चूल बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
शेतकरी संपाचे लोण चंद्रपूर जिल्ह्यातही पोहचू लागले आहे. अशातच अचानक या संपाबाबत संभ्रमाची स्थिती निर्माण केली जात आहे. असे असले तरी भद्रावती तालुक्यातील शेतकऱ्यांनी मात्र संपात सहभागी होत असल्याचे म्हटले आहे. तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून त्यांनी तीन प्रमुख मागण्या रेटून धरल्या आहेत. यात संपूर्ण कर्जमाफी करण्यात यावी, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागु करण्यात याव्या, ६० वर्षावरील शेतकऱ्यांना पेन्शन लागू करण्यात यावे यांचा समावेश आहे.
भद्रावती तालुक्यातील शेतकरी होणाऱ्या अन्यायामुळे त्रस्त आहेत. शेतकऱ्यांना उत्पादन खर्च भरून निघेल, एवढा भाव मिळत नाही. दुधालासुध्दा काडीमोल भाव आहे. याचा परिणाम म्हणून शेतकरी आत्महत्या करतो. शेतकरी निराश होऊन संपासारख्या अस्त्राचा वापर करण्यास पुढे आला आहे. या राज्यव्यापी शेतकरी संपाच्या आंदोलनात भद्रावती तालुकयातील शेतकरीसुध्दा सहभागी होत असल्याचे म्हटले आहे. तालुक्यातील वडेगाव येथील माधव जीवतोडे या शेतकऱ्याने तर शासकीय धोरणाला कंटाळून रविवारपासून चुल बंद आंदोलन सुरु केले आहे. आज त्यांच्या घरात चुलच पेटविण्यात आली नाही.