शेतकऱ्यांनी अधिकृत बियाण्यांची पेरणी करावी
By Admin | Updated: June 15, 2017 00:32 IST2017-06-15T00:32:54+5:302017-06-15T00:32:54+5:30
शेतकऱ्यांनी अधिकृत बियाणांचीच खरेदी करून पेरणी करावी.

शेतकऱ्यांनी अधिकृत बियाण्यांची पेरणी करावी
देवराव भोंगळे : अनधिकृत बियाणे विक्री करणाऱ्यांवर कारवाईचे निर्देश
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : शेतकऱ्यांनी अधिकृत बियाणांचीच खरेदी करून पेरणी करावी. अनेक शेतकरी अनधिकृत चोर बीटी बियाणे वापरत असून अनधिकृत बियाण्यांमुळे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नुकसान झाल्यास शासनाकडून नुकसान भरपाई मिळण्यास ते शेतकरी अपात्र राहतील. त्यामुळे अधिकृतच बियाणे वापरून पेरणी करण्याचे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे यांनी केले.
जिल्हा परिषदेच्या समिती कक्षात मंगळवारी आयोजित खरीप हंगाम संदर्भात कृषी निविष्ठा (बियाणे व रासायनीक खते) व गुणनियंत्रण विषयक आढावा सभेमध्ये बोलत होते. बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक सिरसे, उपाध्यक्ष कृष्णा सहारे, कृषी, पशुसंवर्धन मत्सव्यवसाय समिती सभापती अर्चनाताई जिवतोडे, वरोराच्या पं. स. सभापती रोहीणी देवतळे, जि. प. सदस्य आसुटकर, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी हसनाबादे, कृषी विकास अधिकारी लोहोट, सर्व तालुका कृषी अधिकारी व अर्धवेळ गुणनियंत्रक उपस्थित होते.
ज्या शेतकऱ्यांकडे किंवा दुकानदाराकडे अनधिकृत बियाणे सापडतील, त्यांच्यावर कायद्याअंतर्गत कारवाई करावी, अशा सूचना बैठकीत देण्यात आल्या. शेतकऱ्यांनी अधिकृत बियाणेच वापरावे, याकरिता कृषी विभागाकडून प्रचार प्रसिध्दी करावी व उपाययोजना करुन अहवाल सादर करण्याच्या सूचनाही भोंगळे यांनी केल्या. यावेळी प्रत्येक पंचायत समीतीचा आढावा घेऊन चर्चा करण्यात आली. संचालन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी हसनाबादे तर आभार लोहोट यांनी मानले.