शेतकऱ्यांनी तपासावी सोयाबीनची उगवण क्षमता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:47 IST2021-05-05T04:47:20+5:302021-05-05T04:47:20+5:30
चंद्रपूर : पुढील महिन्यात होणाऱ्या पेरणीसाठी सोयाबीन बियाणाची पेरणीपूर्व उगवणक्षमता तपासणे गरजेचे असल्याने शेतकऱ्यांनी घरच्या घरी उगवणक्षमता ...

शेतकऱ्यांनी तपासावी सोयाबीनची उगवण क्षमता
चंद्रपूर : पुढील महिन्यात होणाऱ्या पेरणीसाठी सोयाबीन बियाणाची पेरणीपूर्व उगवणक्षमता तपासणे गरजेचे असल्याने शेतकऱ्यांनी घरच्या घरी उगवणक्षमता तपासून घ्यावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी केले आहे.
खरीप हंगाम २०२१-२२ मध्ये शेतकऱ्यांनी स्वतःकडील सोयाबीन बियाण्याची पेरणीपूर्वी उगवण क्षमतेची चाचणी करणे गरजेचे आहे. त्यामुळे पेरणी करतेवेळी बियाण्याचे प्रमाण किती ठेवावे याबाबत अंदाज येऊ शकतो. शेतकऱ्यांनी घरच्या घरीच उगवण क्षमतेची चाचणी करावी व चाचणीपूर्वी काळजी घ्यावी. शेतकऱ्यांनी स्वत:कडे असलेल्या सोयाबीन बियाण्याची चाळणी करून त्यामधील काडीकचरा, खडे, लहान व खुरटलेले बियाणे वेगळे करावे. चाळणीनंतर स्वच्छ झालेले समान आकाराचे बियाणे उगवण क्षमता चाचणीसाठी निवडावे.
बाॅक्स
अशी आहे उगवण क्षमता तपासण्याची प्रक्रिया :
एक कागद घेऊन पाण्याने ओला करावा. प्रत्येक दहा बिया घेऊन
त्या एका रांगेत समान अंतर सोडून कागदाच्या टोकाच्या भागावर ठेवून त्याची गुंडाळी करावी. अशा रीतीने १०० बियांच्या १० गुंडाळ्या तयार कराव्यात. नंतर या गुंडाळ्या पॉलिथीन पिशवीत चार दिवस तशाच ठेवाव्यात. चार दिवसानंतर त्या हळूहळू उघडून पाहून त्यामध्ये बीजांकृत झालेल्या बिया मोजाव्यात. जर ती संख्या ६० असेल तर उगवण क्षमता ६० टक्के आहे, असे समजावे. जर ती संख्या ८० असेल तर उगवणक्षमता ८० टक्के आहे असे समजावे. अशा पध्दतीने घरच्या घरी उगवण क्षमतेचा अंदाज घेता येतो.
सोयाबीन बियाण्याची उगवणक्षमता चांगली म्हणजे ७० टक्क्यां पेक्षा जास्त असेल तर शिफारस केलेल्या मात्रेनुसार पेरणीसाठी प्रति हेक्टरी ७५ किलो बियाणे वापरावे. शेतकऱ्यांनी स्वतः कडील बियाणे वापरण्यापूर्वी त्याची उगवण क्षमता घरच्या घरी तपासून नंतरच अशा बियाण्यांची पेरणी करावी.