कापूस विक्रीसाठी शेतकऱ्यांनी धरली तेलंगणाची वाट

By Admin | Updated: November 7, 2015 00:47 IST2015-11-07T00:47:01+5:302015-11-07T00:47:01+5:30

दिवाळी सण तोंडावर आला असताना शेतकऱ्यांजवळ एक सदामही पैसा शिल्लक नाही.

Farmers to sell cotton in Telangana | कापूस विक्रीसाठी शेतकऱ्यांनी धरली तेलंगणाची वाट

कापूस विक्रीसाठी शेतकऱ्यांनी धरली तेलंगणाची वाट

प्रकाश काळे गोवरी
दिवाळी सण तोंडावर आला असताना शेतकऱ्यांजवळ एक सदामही पैसा शिल्लक नाही. हाती असलेला सर्व पैसा खर्च झाल्याने शेतकऱ्यांचा खिसा रिकामा झाला आहे. कापूस वेचणाऱ्या मजुरांचे पैसे व इतर खर्च कसा करायचा, या विवंचनेत शेतकरी असताना खासगी व्यापाऱ्यांकडून पांढऱ्या सोन्याची अक्षरश: लूट केली जात आहे. मात्र परिस्थितीचा गुलाम झालेल्या शेतकऱ्यांना मनात इच्छा नसतांनाही कवडीमोल भावात कापूस विकावा लागत असून कापूस विक्रीसाठी शेतकऱ्यांनी आता तेलंगणाची वाट धरली आहे.
शासनाने पणन महासंघाच्या कापूस खरेदीचा शुभारंभ ५ नोव्हेंबरला करण्यात आला. चार हजार १०० रुपये हमी भावाने शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करण्यात येत आहे. अगदी दिवाळीच्या तोंडावर शासनाने पणन महासंघातर्फे ही कापूस खरेदी सुरू केल्यामुळे शेतकऱ्यांची कापूस विक्रीसाठी धावपळ सुरू झाली आहे. मात्र चंद्रपूर जिल्ह्यातील बहुतांश सरकारी कापूस संकलन केंद्र सुरू झाले नसल्याने शेतकऱ्यांना कापूस कवडीमोल भवात खासगी व्यापाऱ्यांना विकावा लागत आहे. चंद्रपूर जिल्ह्यात कापसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. त्यामुळे जिल्ह्यात कापसाची मोठी बाजारपेठ असणे अपेक्षित होते. कापसाची बाजारपेठ व्हावी ही शेतकऱ्यांची अनेक वर्षापासूनची मागणी आहे. मात्र कापूस पिकवूनही तो शेतकऱ्यांना परप्रांतात नेऊन विकावा लागत आहे. दिवाळी अगदी तोंडावर आली असताना पणती लावायलाही शेतकऱ्यांजवळ पैसे उरले नाही. महागाईचा भस्मासूर दिवसेंदिवस वाढत चालला. त्या तुलनेत शेतकऱ्यांच्या कापसाचे भाव वाढणे आवश्यक होते. यावर्षी कापसाचे दर वाढेल, अशी आस शेतकऱ्यांना होती. मात्र कापूस दरवाढीत कोणताही बदल झाला नाही. उलट कापसाची आवक पाहूण खासगी व्यापारी कापसाचे भाव पाडत आहे.
तेलंगणा राज्यातील आदिलाबाद शहरात कापसाची सर्वात मोठी बाजारपेठ आहे. आदिलाबाद, बेला व यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथील खासगी कापूस बाजारपेठेला शेतकऱ्यांनी अधिक पसंती दिल्याने याचा पुरेपूर फायदा खासगी व्यापारी घेत आहेत. ऐन दिवाळीच्या तोंडावर कापसाची आवक वाढल्याने खासगी व्यापाऱ्यांनी तीन हजार ७०० ते तीन हजार ८०० रुपयांपर्यंत कापसाचे भाव पाडल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. दररोज शेकडोहून अधिक मेटॅडोरने कापूस परप्रांतात विक्रीसाठी जात आहे. हा सारा आर्थिक ताण शेतकऱ्यांना परवडणारा नाही. मात्र हातावर आणून पानावर खाणाऱ्या कापूस वेचणी मजुरांना पैसे द्यायचे कुठून, इतर खर्च कसा करायचा, या विवंचनेत सापडलेल्या शेतकऱ्यांना मनात इच्छा नसतानाही कापूस कवडीमोल भावात विकावा लागत आहे.
शासनाच्या सरकारी कापूस संकलन केंद्राचा श्रीगणेशाच झाला नाही. त्यामुळे याचा सर्व फायदा खासगी कापूस व्यापाऱ्यांनी उचलला आहे. शेतकऱ्यांना कापूस विकावाच लागतो, ही खासगी व्यापाऱ्यांची पक्की धारणा झाली आहे. शासनाची शेतकऱ्यांना साथ नसल्याने व्यापाऱ्यांनी मनमानी सुरू केली केली आहे. शेतकऱ्यांची होत असलेली फरफट जबाबदार लोकप्रतिनिधींना का दिसत नाही, असा अनेकांना पडणारा प्रश्न काळजात घर करणारा आहे. मात्र शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नावर कुणीही लक्ष द्यायला तयार नाही.

Web Title: Farmers to sell cotton in Telangana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.