बियाणे वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ
By Admin | Updated: June 25, 2016 00:41 IST2016-06-25T00:41:57+5:302016-06-25T00:41:57+5:30
मृग नक्षत्रामध्ये काही गावात बऱ्यापैकी पाऊस पडल्याने मशागत करण्यात आलेल्या शेतात शेतकऱ्यांनी पेरणी करुन घेतली.

बियाणे वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ
हवालदिल : हवामान खात्याच्या अंदाजाने नुकसान
वरोरा: मृग नक्षत्रामध्ये काही गावात बऱ्यापैकी पाऊस पडल्याने मशागत करण्यात आलेल्या शेतात शेतकऱ्यांनी पेरणी करुन घेतली. हवामान खात्यानेही पाऊस येईल असा अंदाज वर्तविला होता. त्यामुळे शेतकरी निश्चिंत होते. मात्र आता त्यांना पावसाअभावी बियाणे वाचविण्यासाठी धावपळ करावी लागत आहे.
यावर्षीपासून जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पडणाऱ्या पावसाचे प्रमाण अधिक राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्यातर्फे वारंवार मे महिन्यात वर्तविला जात होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपली हातातील कामे बाजूला सारून शेतीच्या मशागतीला प्राधान्य दिले. बियाणांची वेळेवर टंचाई निर्माण होऊ नये म्हणून बियाणे घेऊन ठेवले. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राज्यात अनेक गावात चांगला पाऊस पडला.आता आपल्याकडेही पाऊस बरसणार, असे गणित लावून शेतकऱ्यांनी घरी घेऊन ठेवलेले कपाशी, तूर व सोयाबीनच्या बियाणांची पेरणी करुन टाकली. मात्र पावसाने पाठ फिरविल्याने पहिल्या पावसात जमिनीत गेलेले बियाण्यांचे जमिनीवर कोंब आले. त्यानंतर तापमानात वाढ झाल्याने कोंब वाळत चालले आहे.
काही बियाणे जमिनीतच राहिल्याने खराब झाले आहे. अशा शेतकऱ्यांना दुबार पेरणीचा फटका बसणार आहे. ज्या शेतकऱ्यांच्या भागात पाऊस झाला नाही, ते बियाणे वाचविण्यासाठी धावपळ करताना दिसून येत आहे. (तालुका प्रतिनिधी)