पाण्यासाठी शेतकरी रस्त्यावर
By Admin | Updated: August 27, 2016 00:30 IST2016-08-27T00:30:58+5:302016-08-27T00:30:58+5:30
गोसीखुर्द कालव्याचे पाणी शेतकऱ्यांना मिळात नसल्याने अखेर तालुक्यातील पाच गावातील हजारो शेतकऱ्यांनी ...

पाण्यासाठी शेतकरी रस्त्यावर
गडचिरोली-नागपूर मार्ग रोखला : दोन तास वाहतूक ठप्प
ब्रह्मपुरी : गोसीखुर्द कालव्याचे पाणी शेतकऱ्यांना मिळात नसल्याने अखेर तालुक्यातील पाच गावातील हजारो शेतकऱ्यांनी नागपूर-गडचिरोली राज्य मार्गावर किन्ही गावाजवळ शुक्रवारी दुपारी तीन वाजता रास्ता रोको आंदोलन केले. शेतकऱ्यांनी तब्बल दोन तास वाहतूक रोखून धरल्याने अखेर प्रशासनाला मध्यस्ती करावी लागली.
गोसीखुर्दच्या पाण्यासाठी शेतकरी आंदोलनाच्या पावित्र्यात असे वृत्त गुरुवारी लोकमतने प्रकाशित केले होते. मात्र प्रशासनाने दखल घेतली नाही. त्यामुळे शुक्रवारी शेतकऱ्यांनी रस्ता रोको करून रोष व्यक्त केला. गोसीखुर्द कालवा बी-३ कालवा किन्ही या गावाजवळ गट क्र. १३९ मध्ये ६० मीटरचे काम मागील वर्षापासून बंद आहे. खरकाडा, निलज, रुई, पाचगाव, रणमोचन, पिंपळगाव इतर गावातील ५ हजार ७३९ हेक्टर आर पैकी ३४४ हेक्टर शेतजमिनीला हे पाणी मिळणार होते. परंतु ६० मीटर जमिनीच्या मालकाने अडवणूक केल्याने पाण्यापासून शेतकरी वंचित होते.
या संदर्भात शेतकऱ्यांनी गोसीखुर्द विभाग, उपविभागीय अधिकारी, जिल्हाधिकारी, तहसीलदार यांना वेळोवेळी ही गंभीर बाब लक्षात आणून दिली. पण काही तोडगा न निघाल्याने शुक्रवारी दुपारी मनसे जिल्हाउपाध्यक्ष आनंद बावणे व भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष नानाजी तुपट यांच्या नेतृत्वात हजारो शेतकऱ्यांनी राज्य मार्गावर आडवा ट्रक लावून दोन तास वाहतूक रोखून धरली. शेवटी तहसीलदार विद्यासागर चव्हाण, नायब तहसीलदार राठोड, गोसिखुर्द कालव्याचे सहा. अभियंता जितेंद्र मडावी, पोलीस निरीक्षक ओ.बी. अंबाडकर यांच्या मध्यस्थितीने तोडगा काढून दोन तासानंतर वाहतूक सुरू झाली. यावेळी रणमोचनचे सरपंच मंगेश दोनाडकर, खरकाडाचे सरपंच वंदना खरकाटे, उपसरपंच तारकेश्वर तोंडरे, रविंद्र ढोरे, योगेश ढोरे व पाच गावातील हजारो शेतकरी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)
पाण्यासाठी प्रसंगी
मरण्याची तयारी
जमावकर्त्यांनी रस्ता रोखून गडचिरोली व नागपूरला जाणारी असंख्य वाहने अडवून ठेवली. त्यामागे त्यांच्या शेतीतील धान पिके करपायला लागली असल्याने हा रोष व्यक्त करण्यात आला. जर या दोन-तीन दिवसात धानाला पाणी मिळाले नाही तर प्रसंगी आम्ही मरणासही मागे पुढे पाहणार नाही, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.
रखडलेले बांधकाम सोमवारपासून सुरू करण्याची लेखी हमी दिली आहे. वरिष्ठांचे मार्गदर्शन घेवून काम पूर्ण करण्यात येईल.
- जितेंद्र मडावी
सहा. अभियंता, गोसीखुर्द विभाग.