शेतकरी बँकेतून रिकाम्या हाताने परतले

By Admin | Updated: June 16, 2017 00:33 IST2017-06-16T00:33:16+5:302017-06-16T00:33:16+5:30

शेतकऱ्यांची बँक म्हणून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला संबोधले जाते. मात्र राजुरा तालुक्यातील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या

Farmers return empty-handed from the bank | शेतकरी बँकेतून रिकाम्या हाताने परतले

शेतकरी बँकेतून रिकाम्या हाताने परतले

खरीपाच्या तोंडावर पैसा मिळेना : जास्त रक्कम देण्याला बँकेचा नकार
प्रकाश काळे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोवरी : शेतकऱ्यांची बँक म्हणून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला संबोधले जाते. मात्र राजुरा तालुक्यातील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या गोवरी शाखेत शेतकऱ्यांना पैसाच मिळत नसल्याने दिवसभर ताटकळत राहण्याची वेळ आली आहे. पैशाअभावी शेतकऱ्यांचा खरीप हंगाम धोक्यात येण्याची भिती असून शेतकऱ्यांना पैसा देण्यास बँक नकार देत आहे.
गोवरी येथे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची शाखा आहे. या बँकेत गोवरी परिसरातील बहुतांश गावातील शेतकऱ्यांचे खाते आहेत. गेल्या आठ दिवसांपासून शेतकरी बँकेत चकरा मारत असून बँकेत कॅश नसल्याने शेतकऱ्यांना रिकाम्या हाताने आल्यापावली परत जावे लागत आहे. बँकेत रक्कम आलीच तर ५ हजार घेऊन जा, दहा हजार रुपयांचा विड्राल केल्यास पैसे मिळणार नाही, असे कर्मचाऱ्याकडून सांगण्यात येत आहे.
सध्या खरीप हंगामाची लगबग सुरू झाली आहे. बी-बियाण्यांची जुळवाजुळव करण्यासाठी शेतकऱ्यांना पैशाची नितांत गरज आहे. परंतु, बँकेतून पैसेच मिळत नसल्याने शेतकऱ्यांसह नागरिकांना बँकेसमोर ताटकळत राहण्याची पाळी आली आहे. प्रस्तुत प्रतिनिधीने बँकेला भेट दिली असता, बँकेत कॅश न आल्याने शेतकऱ्यांनी बँकेसमोर रांगा लावल्या होत्या.
बँकेतून पैसे मिळावे म्हणून वाट पाहत बसलेल्या शेतकऱ्यांना विचारणा केली असता, सध्या आमचा शेतीचा हंगाम आहे. बियाणे घेण्यासाठी पैशाची आवश्यकता आहे. मात्र गेल्या आठ दिवसांपासून बँकेत चकरा मारूनही पैसे मिळात नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. याकडे प्रशासनाने लक्ष देऊन शेतकऱ्यांना तत्काळ त्यांचे पैसे उपलब्ध करून देण्याची मागणी आहे.

काही भागात पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी खरीप हंगामासाठी पैशाची जुळवाजुळव करायला लागला आहे. परंतु, जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या गोवरी शाखेतून पैसाच मिळत नसल्याने हंगाम कसा करायचा, या विवंचनेत शेतकरी सापडला आहे.


शेतीचा खरीप हंगाम अगदी तोंडावर आहे. बी-बियाणे घेण्यासाठी पैशाची आवश्यकता आहे. पैशासाठी बँकेत गेल्यावर पैसा मिळत नसल्याने रिकाम्या हाताने परतावे लागते. यामुळे खरीप हंगाम धोक्यात येण्याची भिती आहे.
- गणपत जुनघरी, शेतकरी, गोवरी.
जिल्हा बँकेच्या मुख्य शाखेतून आमच्या बँकेला कमी पैसा मिळतो. प्रत्यक्षात २० लाखांची मागणी असते. परंतु, बँकेला दोन-तीन लाख दिले जाते. त्यामुळे बँकेत पैशाचा तुटवडा निर्माण झाला आहे. पैसाच येत नसल्याने ग्राहकांना पैसे देणे कठीण झाले आहे.
- केशव बोढे, व्यवस्थापक
जिल्हा मध्यवर्ती बँक, गोवरी.

Web Title: Farmers return empty-handed from the bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.