पोंभूर्णा तालुक्यातील शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात
By Admin | Updated: November 14, 2015 01:18 IST2015-11-14T01:18:34+5:302015-11-14T01:18:34+5:30
मध्यम प्रतिचे धानपिक हाती येत असताना पावसाने दडी मारल्याने पाण्याअभावी तालुका परिसरातील धानपीक करपायला लागले आहे.

पोंभूर्णा तालुक्यातील शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात
कर्जमाफीची मागणी : पाण्याअभावी धानपीक लागले करपायला
पोंभूर्णा : मध्यम प्रतिचे धानपिक हाती येत असताना पावसाने दडी मारल्याने पाण्याअभावी तालुका परिसरातील धानपीक करपायला लागले आहे. त्याचे रुपांतर तणसात झाले असल्याने यावर्षीची अल्पभूधारक शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जात असल्याचे चित्र दिसत आहे.
परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी यावर्षी कर्ज काढून महागड्या बियाणांची खरेदी केली. महागडी खते घेतली. हातात होते नव्हते ते सगळे शेतीत झोकून देऊन मोठ्या मेहनतीने शेतकरी शेती करण्याच्या कामाला लागला होता. यावर्षी तरी धान्य भरभराटीने होवून लावलेला पैसा निघून उर्वरीत पैसे मुला- बाळांच्या शिक्षणासाठी, लग्नासाठी, घरकुटुंब चालविण्यासाठी शिल्लक राहतील, अशी आशा शेतकऱ्यांची होती. परंतु निसर्गाने यावर्षीसुद्धा शेतकऱ्यांच्या आशा धुळीस मिळविल्या. ऐन धानपीक हातामध्ये येण्याच्या क्षणात धानपिकावर अनेकविध रोगांनी हल्ला चढविला. त्यामुळे परिसरातील अनेक शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.
काही धानपीक तग धरुन असतानाच शेवटी एका पाण्याची आवश्यकता होती. परंतु पावसाने दगा दिल्याने अखेर शेवटच्या टोकावर असलेल्या धान पीक करपून गेले आणि त्याचे आता तणसात रुपांतर झाले आहे. त्यामुळे संपूर्ण दिवाळी अंधारात केली आहे.
दरवर्षी कधी ओला तर कधी सुका दुष्काळ, त्यातच रोगराई यामुळे सतत नापिकीला शेतकऱ्याला सामोरे जावे लागत असल्याने शेतकऱ्यांवर दिवसेंदिवस कर्जाचा डोंगर वाढत चालला आहे. एकीकडे भारताचा कणा म्हणून संबोधल्या जाणाऱ्या या शेतकरी दादाचा पाठीचा कणा मोडायला लागला तरी त्याच्याकडे कुणाचे लक्ष नाही. जर का जगाच्या या पोशिंद्याचाच कणा मोडेल तर या देशाची काय अवस्था होईल. यासाठी शासनाने ग्रामीण शेतकऱ्यांची होणारी दयनीय स्थिती दूर करण्यासाठी आर्थिक मदत करुन थकीत कर्ज माफ करावे. तेव्हाच त्यांचे खरे दिवाळीचे स्वप्न साकार होतील. (तालुका प्रतिनिधी)