दुष्काळाने मोडला शेतकऱ्यांचा कणा
By Admin | Updated: March 11, 2015 00:59 IST2015-03-11T00:59:41+5:302015-03-11T00:59:41+5:30
अपूरे पर्जन्यमान, नापिकी व सिंचनाच्या सोयी अभावी पहाडावरील शेतकरी दुष्काळाच्या चक्रात अडकला आहे. कधी कोरडा दुष्काळ तर कधी ओला दुष्काळाने ...

दुष्काळाने मोडला शेतकऱ्यांचा कणा
जिवती : अपूरे पर्जन्यमान, नापिकी व सिंचनाच्या सोयी अभावी पहाडावरील शेतकरी दुष्काळाच्या चक्रात अडकला आहे. कधी कोरडा दुष्काळ तर कधी ओला दुष्काळाने पहाडावरील शेतकऱ्यांचा कणाच मोडला जात असल्याचा चित्र सध्या बघायला मिळत आहे.
खरीप हंगामात पावसाने दगा दिल्याने उत्पनात घट्ट झाली. झालेला खर्च निघाला नाही, असे अस्मानी संकट कोसळल्यावरही शासनाने शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव दिला नाही. दुष्काळाच्या चक्रव्यवहातून सावरण्यासाठी थोडीफार सिंचनाची सोय असलेल्या शेतकऱ्यांनी रबीची लागवड केली. पिकही जोमात आले. मात्र ऐनवेळी अवकाळी पाऊस झाल्याने हाती आलेल्या पिकाची नासाडी झाली. जिवती तालुका व मागास तालुका म्हणून ओळखला जात असून तालुक्यातील संपूर्ण शेती खडकाची आहे. येथील नागरिकांचा मुख्य व्यवसाय शेती आहे. सिंचनाची सोय नसल्याने निसर्गाच्या भरवश्यावर कोरडवाहू शेती करणे हा त्यांचा हातभट्यांचा व्यवसायच असल्यासारखे आहे. पिकेल तर शेती नाही तर मातीच आहे. दिवसभर शेतात राबराब करुन सुद्धा पाहिजे तेवढे उत्पन्न घेता येत नाही. पिकले तरी विकले जात नाही. निसर्गाचा दगा त्यात शासनाकडून शेतमालाला हमी भाव नाही.
यामुळे पहाडावरील शेतकऱ्यांवर आस्मानी संकटच कोसळले आहे. खरीप हंगाम गेल्यानंतर रबी हंगामात तरी सावरता येईल, अशी आशा मनात घेवून शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा अवकाळी पावसाने चुराडा केला. डोळ्यादेखत त्यांची स्वप्ने गोठली गेली. त्यामुळे कर्जबाजारी झालेल्या शेतकरी वर्गाच्या मनात शेती व्यवसायाबद्दल उदासिनता निर्माण झाली आहे. निसर्गाच्या भरवश्यावर काम करणाऱ्या शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चाचा ताळमेळ आणि त्याला मिळणारा मोबदला याचे गणित कधीच जमले नाही. सावकारी कर्ज, बँक कर्ज घेवून मायभूमीला सजविणाऱ्या शेतकऱ्याला निसर्गाने हतबल केले आहे. शासनाने दृष्काळग्रस्त मदत जाहीर केली. मात्र तेही दु:खावर मलमपट्टी केल्यासारखीच आहे. बहुतांश शेतकऱ्यांना तर जमिनीचा मालकी हक्कच नसल्याने त्याचा फायदाही घेत येत नाही. (तालुका प्रतिनिधी)