पगारातून बळीराजाच्या पशुधनाचा विमा

By Admin | Updated: August 18, 2016 00:34 IST2016-08-18T00:34:10+5:302016-08-18T00:34:10+5:30

शेतकऱ्यांची कर्जमाफीची मागणी शासन दरबारी रखडलेली आहे. तर सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू करण्यासाठी...

Farmer's livestock insurance from salary | पगारातून बळीराजाच्या पशुधनाचा विमा

पगारातून बळीराजाच्या पशुधनाचा विमा

आमदार: पाच लाख रुपयांचा धनादेश विमा कंपनीस सुपूर्द
चिमूर : शेतकऱ्यांची कर्जमाफीची मागणी शासन दरबारी रखडलेली आहे. तर सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू करण्यासाठी आंदोलनाच्या तयारी सुरू आहे. मात्र या दोन्ही मागण्याला बगल देत आमदार व मंत्र्यांचे पगार वाढविण्यात आल्याने शेतकरी, कर्मचारी तथा सर्वसामान्य नागरिकामध्ये अनेक प्रतिक्रिया उमटल्या. यामध्ये वाढलेला पगार न घेणारे मोजके आमदार निघाले. दरम्यान, आपला वाढलेला पगार स्वीकारला असला तरी चिमूर विधानसभा क्षेत्रातील विधानपरिषदेचे आमदार मितेष भांगडिया व त्यांचे सुपूत्र आमदार किर्तीकुमार भांगडिया या पितापुत्राने शेतकऱ्यांप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करीत आपल्या पगाराच्या रक्कमेतून चिमूर विधानसभा क्षेत्रातील बळीराजाच्या ढवळ्या- पावळ्याला सुरक्षा कवच देवून बळीराजाला मदतीचा हात देत आपले सामाजिक दायित्व निभावले आहे.
एकेकाळी देशाच्या आर्थिक व्यवस्थेचा कना समजला जाणारा शेती व्यवसाय डबघाईस आला आहे. शेती व्यवसाय पूर्णता निसर्गावर अवलंबून आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेती व्यवसाय नेहमी तोट्यात चालला आहे. याचा फटका शेतकऱ्यांना बसून शेतकरी आत्महत्या करीत आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबाव्या म्हणून शेतकरी कर्ज माफीची मागणी सरकारकडे करीत आहे. मात्र सरकार शेतकऱ्याच्या या मागणीकडे दुर्लक्ष करीत आहे. शेती व्यवसाय काही प्रमाणात पुढे यावा म्हणून शासन अनेक योजना शेतकऱ्यांसाठी राबवित आहे. शेततळे, जलयुक्त शिवार, बांधावर खत, पतपुरवठा या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न होत असला तरी शेतकऱ्यांचा कोणीच वाली नसल्याची भावना शेतकऱ्यात उमटू लागली आहे.
समाजासाठी आपलेही काही देणे आहे, या उद्देशाने प्रेरित असलेले चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार किर्तीकुमार भांगडिया यांनी युवा शक्ती संघटनेच्या मार्फतीने सुरु केलेली जनसेवा आमदार असतानाही सुरुच ठेवण्यात आल्याची प्रचिती चिमूर क्षेत्रातील नागरिकांना येत आहे. शेतकऱ्याची आर्थिक परिस्थिती जेमतेम असल्याने व सध्या पेरणीचा हंगाम असल्याने शेतकरी आर्थिक टंचाईत आहे. त्यामुळे शेतकरी आपल्या पशुचा विमा काढू शकत नाही व अचानक झालेल्या दुर्घटनेतून शेतकरी बाहेर येऊ शकत नाही.
तसेच शेती व्यवसायामध्ये बैलजोडीचे महत्व अनन्यसाधारण आहे. बैलाशिवाय शेतकरी शेती करु शकत नाही. अशात दुर्घटना झाल्यास शेतकऱ्यापुढे आत्महत्या करण्याशिवाय उपाय नसतो. मात्र अशा अचानक येणाऱ्या आपत्तीतून काही प्रमाणात मदत व्हावी म्हणून शासनाने पशुधन विमा योजना सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना काही विमा भरुन बैल जोडीचे विमा कवच करता येते.
या शेतकऱ्यांना काही प्रमाणात मदत व्हावी व आपणही समाजाला काही देणे लागतो या मनासिकतेतून चिमूरचे आमदार मितेष भांगडिया व किर्तीकुमार भागंडिया या पितापुत्राने आपल्या आमदारकीच्या पगारातील पाच लाख रुपयातून चिमूर विधानसभा क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या ढवळ्या- पावळ्या बैलजोडीला सुरक्षा कवच देण्यासाठी रकमेचा धनादेश शहीद स्मृती दिन सोहळा या कार्यक्रमादरम्यान राज्याचे अर्थ व नियोजन तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते न्यू इंडिया इन्सुरन्स कंपनीचे अधिकारी व पशुविभागाचे अधिकारी यांच्या स्वाधीन केला. आमदार पिता-पुत्राच्या या सामाजिक दायित्वाने चिमूर क्षेत्रातील बळीराजाला काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Farmer's livestock insurance from salary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.