शेतकरी, शेतमजूर रस्त्यावर

By Admin | Updated: January 1, 2016 01:36 IST2016-01-01T01:36:51+5:302016-01-01T01:36:51+5:30

केंद्र शासनाने नुकतेच शासकीय कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याची घोषणा केली. मात्र शेतकऱ्यांच्या सतत

Farmers, laborers on the road | शेतकरी, शेतमजूर रस्त्यावर

शेतकरी, शेतमजूर रस्त्यावर

चंद्रपूर : केंद्र शासनाने नुकतेच शासकीय कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याची घोषणा केली. मात्र शेतकऱ्यांच्या सतत आत्महत्या घडत असतानाही शेतकऱ्यांचे हिताचे एकही निर्णय शासनाने घेतले नाही. शेतकऱ्यांच्या हितासाठी स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी करावी व शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी शासनाने ठोस निर्णय घ्यावे या मागणीसाठी शेतकरी नेते प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आ. बच्चू कडू यांच्या नेतृत्वात गुरूवारी चंद्रपुरात मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात शेकडो शेतकरी-शेतमजूर सहभागी झाले होते.
शासकीय विश्रामगृह येथून मोर्चाची सुरुवात झाली. मोदी सरकारने नवीन वर्षात शासकीय कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याची घोषणा केली. खासदारांना भरमसाठ पगारवाढ केली. मात्र दररोज शेतकऱ्यांच्या आत्महत्या घडत असतानाही शेतकऱ्यांच्या हिताचे एकही निर्णय शासन घेत नाही. शेतकऱ्यांच्या हितासाठी स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी करावी, पेरणी ते कापणीपर्यंतची कामे रोजगार हमी योजनेतून करण्यात यावी, चंद्रपूर जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करावा, ठेकेदारी कामगार, अपंग व्यक्ती व स्थानिक बेरोजगारांना न्याय द्यावा, अपंगानांना स्वावलंबी करण्यासाठी योजना आखाव्या, अपंगासाठी असलेल्या १९९५ च्या कायद्याची अंमलबजावणी करावी, जिल्ह्यातील प्रलंबित सिंचन प्रकल्प मार्गी लावावे, वन्यप्राण्यांकडून होणारे नुकसान टाळण्यासाठी वन विभागाकडून शिघ्र कृती दल स्थापन करावा, नुकसानग्रस्तांना मदत देण्यासाठी कायमस्वरूपी धोरण आखावे, किटकनाशक, बी-बियाणांमध्ये भेसळ करणाऱ्यांवर फौजदारी कारवाई करावी, ठेकेदारी कामगार, अस्थायी कामगारांचे शोषन थांबविण्यासाठी उचित उपाययोजना करावी, कामगारांचे जीवनमान सुधारण्यासाठी धोरण आखावे, परराज्यातील कामगार भरतीवर बंदी घालून स्थानिकांना उद्योगामध्ये प्राधान्य द्यावे, जिल्ह्यातील बंद पडलेले उद्योग सुरू करण्यासाठी कार्यवाही करावी आदी मागण्या मोर्चा दरम्यान करण्यात आले.
शहरातील मुख्य मार्गाने निघालेले मोर्चेकरी केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या घरापर्यंत पोहोचले. त्यानंतर ना. हंसराज अहीर यांचे स्वीय सहाय्यक सतीश जोशी यांना निवेदन देण्यात आले. मोर्चामध्ये प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष पप्पू देशमुख यांच्यासह जिल्ह्यातील शेकडो शेतकरी, शेतमजूर व प्रहार संघटनेचे पदाधिकारी सहभागी झाले होते. (स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: Farmers, laborers on the road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.