धान्य पिकवूनही शेतकऱ्यांचे हात रिकामे
By Admin | Updated: December 30, 2016 01:35 IST2016-12-30T01:35:20+5:302016-12-30T01:35:20+5:30
सर्वसामान्य जनता, शेतकरीवर्गाला नोटाबंदीचा मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. पीक हातात आल्यावर हा शेतकरीवर्ग विकून हातात आलेल्या

धान्य पिकवूनही शेतकऱ्यांचे हात रिकामे
पैशाची चणचण : व्यापाऱ्यांकडून मिळतात धनादेश, बँकेचे व्यवहार करणे अडचणीचे
चंद्रपूर : सर्वसामान्य जनता, शेतकरीवर्गाला नोटाबंदीचा मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. पीक हातात आल्यावर हा शेतकरीवर्ग विकून हातात आलेल्या पैशाने देणं- घेणं करुन आपली उपजिविका करतो. मात्र, पीक विकूनही हातात पैसा मिळत नसल्याने रिकाम्या हाताने परतावे लागत असल्याचे चित्र नागभीड तालुक्यात दिसून येत आहे.
डिसेंबर ते जानेवारी या दोन महिन्यांत शेतकऱ्यांचे धान्य निघत असल्याने बहुतेक शेतकरी धान्यविक्रीसाठी बाजार समितीमध्ये नेत असतात. धान्य विकून देण्याघेण्याचे व्यवहार करीत असतात. परंतु नोटाबंदीमुळे पैशाची चणचण भासत आहे. व्यापारीवर्गाकडून शेतकऱ्यांना चेकद्वारे व्यवहार करण्यात येत आहे. त्यामुळे अशिक्षित शेतकऱ्यांना त्रास होत आहे. धान्य विकूनही खर्चासाठी पैसा नाही म्हणण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. अजूनही अनेक शेतकऱ्यांचे स्वत:चे बँकेत खाते नाही. मात्र, शेतकऱ्यांना चेक मिळत नसल्याने बँकेचे खाते काढण्यासाठी हेलपाटे मारावे लागत आहे. नोटाबंदीच्या निर्णयामुळे शेतकरीवर्ग कमालीचा वैतागलेला आहे. ऐन देवाण-घेवाणीच्या हंगामात नोटांचा तुटवडा भासत असल्याने कामे ठप्प पडली आहेत. मुलामुलींचे विवाह जुळविण्याचे कार्यसुद्धा याच महन्यिात पार पडतात. मात्र, नोटाबंदीचा फटका लग्नकार्यालाही बसला आहे.
लहान मोठे कार्य करु म्हटले तर जवळ पैसा नाही. बँका वेळेवर पैसे देत नाही. कमी पैशात काहीच कामे होत नाही. अशा अनेक समस्या नागरिकांसमोर उभ्या आहेत. ग्रामीण भागातसुद्धा नोटाबंदीचा प्रभाव पडला आहे. लहान दुकानदारापासून ते मोठ्या व्यापाऱ्यापर्यंत सर्वानाच नोटाबंदीचा फटका बसला आहे. पैसे नसल्याने अनेकांचे व्यवहार ठप्प पडले आहेत. सध्या सगळीकडे खरेदी-विक्री सुरु असल्याने नगदी रोकड मिळण्यास विलंब होत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांसह शेतकरी त्रस्त आहेत. सर्वसामान्य शेतकऱ्यांना धनादेशावर व्यवहार करणे अडचणी जात आहे. शेतकऱ्यांना बँकेच्या व्यवहाराचे ज्ञान नसल्याने दुसऱ्यांवर अवलंबून राहावे लागत आहे.(वार्ताहर)