शेतकऱ्यांच्या डोळ्यात पुन्हा दाटली आसवं!

By Admin | Updated: August 25, 2016 00:39 IST2016-08-25T00:39:41+5:302016-08-25T00:39:41+5:30

शेतकऱ्यांच्या हिंमतीला संकटाची मालीकाच पुजली आहे. या ना त्या, कारणाने शेतकऱ्यांच्या गळ्याभोवती कर्जाचा फास आवळतच जात आहे.

Farmers' eyes should be dull again! | शेतकऱ्यांच्या डोळ्यात पुन्हा दाटली आसवं!

शेतकऱ्यांच्या डोळ्यात पुन्हा दाटली आसवं!

२० दिवसांपासून पाऊस बेपत्ता : फळधारणेवर आलेल्या पिकांना पावसाची आवश्यकता
प्रकाश काळे गोवरी
शेतकऱ्यांच्या हिंमतीला संकटाची मालीकाच पुजली आहे. या ना त्या, कारणाने शेतकऱ्यांच्या गळ्याभोवती कर्जाचा फास आवळतच जात आहे. शेतकऱ्यांकडे सिंचनाचा अभाव असल्याने अनेकांची शेती निसर्गाच्या पाण्यावर अवलंबून आहे. मात्र गेल्या १५ ते २० दिवसांपासून पाऊस बेपत्ता असल्याने फळधारणेवर आलेले पीक वाळायला लागले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात पुन्हा आसवं दाटल्याचे चित्र दिसून येत आहे.
कृषी प्रधान देशातील शेतकऱ्यांची अवस्था आज क्षणाक्षणाला वाईट होत चालली आहे. सिंचनाचा अभावामुळे अनेकांची शेती निसर्गाच्या पाण्यावर अवलंबून आहे. परंतु निसर्गही आता लहरीपणाने वागायला लागल्याने ‘पाऊस येऊनही बुडवेल अन् जाऊनही बुडवेल’ अशी बिकट अवस्था शेतकऱ्यांची झाली आहे. यावर्षी खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच पावसाने दगा दिला. तब्बल महिनाभर पाऊस उशीरा आला. त्यामुळे उसनवारी व कर्ज काढून जमिनीत टाकलेले बियाणे अपुऱ्या पावसाने उमलण्यापूर्वी कोमेजून गेले. बहुतांश शेतकऱ्यांना त्यावेळी दुबार पेरणीला सामोरे जावे लागले होते. यातून बळीराजा अद्यापही सावरला नाही. कर्ज काढून शेती केलेल्या शेतकऱ्यांजवळ दमडीही शिल्लक नाही.
जुलै महिना वगळता जिल्ह्यात अजूनही दमदार पाऊस झाला नाही. यावर्षी चांगला पाऊस पडेल असे भाकीत हवामान खात्याने वर्तविले होते. मात्र हवामान खात्याचे अंदाज खोटे ठरवित पाऊस पाहिजे त्या प्रमाणात आला नाही. शेतकऱ्यांचे वर्षभराचे गणित पावसावर अवलंबून असते. परंतु पावसाअभावी शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच आली आहे. शेतकऱ्यांच्या पाठिशी राहणाऱ्या निसर्गानेही शेतकऱ्यांना दगा दिला आहे.
सध्या सोयाबिन पिकाचा फळधारणेचा काळ आहे. यावेळी पिकांना पावसाची नितांत आवश्यकता असते. पाण्याअभावी पिकांची वाढ खुंटली आहे. तर फळधारणेवर आलेले सोयाबिनचे पीक उभ्यानेच वाळायला लागले आहे.
शेतकऱ्यांची अवस्था क्षणाक्षणाला वाईट होत चालल्याने शेतकरी पुरता काकुळतीला आला आहे. दिवसरात्रं काबाडकष्ट करूनही शेतकऱ्यांच्या हातात काहीच उरत नाही. मग हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांनी करायचे काय, असा प्रश्न सध्या सगळ्यांनाच उपस्थित होत आहे.

बळीराजाचे आभाळाकडे डोळे
गोंडपिपरी : गेल्या पंधरा दिवसांपासून तालुक्यात पावसाने दडी मारल्याने येथील शेतपिके पाण्याअभावी संकटात सापडली आहे. पावसाळ्याच्या पूर्वार्धात मुसळधार पडणाऱ्या पावसाने अचानकपणे दडी मारल्याने शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे लागले आहे. तालुक्याचा प्रमुख व्यवसाय शेती असून तालुक्यात ८० टक्के लोकांचा उदरनिर्वाह शेती व्यवसायावरच आहे. दोन वर्षापूर्वी झालेल्या अतिवृष्टी व ढगफुटीमुळे शेतकऱ्यांची पिके नष्ट होऊन ओल्या दुष्काळाचे संकट बळीराजावर ओढावले होते. पावसाची अनियमितता व शेतपिके उभे असताना शेतपिकांना बसलेला वादळी फटका यामुळेही शेती व्यवसायावर चांगलाच आघात झाला. यावर्षी मध्यल्या काळात पावसाने दमदार हजेरी लावली. याच दरम्यान शेतकऱ्यांनी सोयाबीन, कापूस, पिकासाठी पेरणी केली. मात्र पावसाचा जोर वाढतच गेल्याने प्रथम पेरणी जमीनदोस्त होऊन शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले. अशा स्थितीतही शेतकऱ्यांनी हिमतीने दुबार पेरणी व धान पऱ्हे टाकले. सध्यास्थितीत शेतपिके उभी असताना गेल्या १५ ते २० दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने उभ्या शेतपिकावर रोगराईचे संकट ओढावले आहे. धान पिकांसह सोयाबीन व कापूस पिकांवरही विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. दोन-चार दिवसात पाऊस झाला नाही तर पीक नष्ट होणार या भितीमुळे ग्रामीण भागात परंपरागत दवे करणे, घट मांडणे आदी कार्यांना सुरुवात झाली असून बळीराजाचे आभाळाकडे लक्ष लागले आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Farmers' eyes should be dull again!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.