शेतकऱ्यांनो, आशा सोडू नका !
By Admin | Updated: December 13, 2014 22:34 IST2014-12-13T22:34:51+5:302014-12-13T22:34:51+5:30
राजस्व अभियानासारख्या योजना जनतेच्या मनातील वैफल्यातील भावना दूर करण्यास मदत करतात. जनता ज्या अडचणींचा सामना करीत आहे, त्या अडचणीवर मात करण्यासाठी शासनाने

शेतकऱ्यांनो, आशा सोडू नका !
समाधान मेळावा : नक्षलग्रस्त गावात पोहोचले राज्यपाल
राजुरा : राजस्व अभियानासारख्या योजना जनतेच्या मनातील वैफल्यातील भावना दूर करण्यास मदत करतात. जनता ज्या अडचणींचा सामना करीत आहे, त्या अडचणीवर मात करण्यासाठी शासनाने नुकत्याच काही मदतीच्या योजना जाहीर केल्या आहेत. सध्या राज्यातील शेतकऱ्यांवर कठीण परिस्थिती ओढविली आहे. अशाही कठीण परिस्थितीत शेतकऱ्यांनी आशा सोडू नये, शासन सदैव आपल्या पाठीशी आहे, अशी ग्वाही देत राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी हताश झालेल्या शेतकऱ्यांना नवी उर्मी दिली.
राजुरा तालुक्यातील लक्कडकोट येथे आयोजित सुवर्ण जयंती राजस्व अभियानांतर्गत समाधान योजना व जनजागरण मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर, राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संध्या गुरूनुले, आमदार अॅड. संजय धोटे, राज्यपालांचे सचिव विकास रस्तोगी, जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर, जिल्हा पोलीस अधिक्षक राजीव जैन, मुख्य कार्यकारी अधिकारी आशुतोष सलील आदी उपस्थित होते.
राज्यपाल पुढे म्हणाले, आता जनतेला जलद सेवा देण्याचे दिवस आले आहेत. सेवा प्राप्त करून घेणे हा जनतेचा हक्क असून सुवर्ण जयंती राजस्व अभियानासारखे कार्यक्रम सर्व विभागाच्या सेवा जनतेच्या दारापर्यंत पोहोचविण्यास मदत करतात. अशा सेवा जनतेला तत्परतेने उपलब्ध करून देण्यात येतात, तेव्हाच जनतेमध्ये समाधान तसेच शासनाप्रति विश्वास निर्माण होतो, असेही राज्यपालांनी स्पष्ट केले.
यावेळी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, तेलगू-मराठी भाषकांचे सांस्कृतिक भवन उभारण्यासाठी आपण संपूर्ण सहकार्य करणार आहोत. या भागातील प्रश्न सोडविण्यासाठी सरकार कटिबध्द असून जनतेच्या कल्याणासाठीच तिजोरीतून खर्च केला जाईल, असे त्यांनी सांगितले. या मेळाव्यात राजस्व विभागाकडून विविध क्षेत्रातील प्राविण्यप्राप्त विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र, वर्ग २ चे वर्ग १ मध्ये रूपांतराचे पट्टे, वनाचे मालकी हक्काचे प्रमाणपत्र, घटस्फोटीत महिलांना धनादेश राज्यपालाच्या हस्ते देण्यात आले. (तालुका प्रतिनिधी)