कालव्याच्या पाण्यापासून शेतकरी वंचित
By Admin | Updated: October 9, 2014 22:58 IST2014-10-09T22:58:56+5:302014-10-09T22:58:56+5:30
सध्या पिकांना पाण्याची गरज आहे. उन्हामुळे शेतातील उभे पिके करपत आहे. त्यामुळे उत्पादनात परिणाम होण्याची शक्यता आहे. कालवे शेतापासून गेले असतानाही पाणी सोडण्यात आले नसल्याने वरोरा

कालव्याच्या पाण्यापासून शेतकरी वंचित
वरोरा : सध्या पिकांना पाण्याची गरज आहे. उन्हामुळे शेतातील उभे पिके करपत आहे. त्यामुळे उत्पादनात परिणाम होण्याची शक्यता आहे. कालवे शेतापासून गेले असतानाही पाणी सोडण्यात आले नसल्याने वरोरा तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये असंतोष पसरला आहे.
तालुक्यातील २२ गावामधून लाल पोथरा धरणातील पाणी कालव्यात सोडण्यात येते. या कालव्यातील पाण्यावर सिंचनाची सोय करण्यात येते. परिसरात याशिवाय इतर कोणतीही सिंचनाची व्यवस्था नाही. वरोरा तालुक्यातील हजारो हेक्टर शेती या कालव्यातील पाण्याने सिंचनाखाली आली आहे. यावर्षी पावसाळ्यात पाऊस कमी पडला. सध्या ऊन तापत असल्याने जमिनीला भेगा पडल्या आहे. यामुळे. पिक करपत आहे. कपाशीच्या पिकामधील पात्या व बोंडे गळून पडत आहे. त्यामुळे पिकांना पाण्याची सक्त आवश्यकता आहे. मात्र पाटबंधारे विभागाने कालव्यात पाणी सोडण्याचे नियोजन अद्यापही केले नसल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
पाणी सोडण्याचे जाहीर प्रकटीकरण करुन दिसही ठरविण्यात आला नाही. एवढेच नाही तर, पाणी वापर संस्थाना याबाबत कळविले सुद्धा नाही. त्यामुळे कालव्यातून पाणी केव्हा मिळेल, याबाबत शेतकरी संभ्रमात आहे. शेतकरी पाटबंधारे विभाग कार्यालयात जावून कालवात पाणी सोडण्याबाबत विचारणा करीत आहे. मात्र त्यांचे समाधानही अधिकाऱ्यांकडून करण्यात येत नसल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. त्यामुळे बावीस गावांतीलस शेतकऱ्यांच्या डोळ्यात सध्या पाणी येत आहे. पाणी सोडावे याकरिता लालपोथरा संयुक्त कालवा पाणी संघर्ष समितीचे अध्यक्ष ओमप्रकाश मांडवकर यांनी अधिकाऱ्यांची भेट घेत आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.(तालुका प्रतिनिधी)