कोठारी भागात कापसाचे पीक घटल्याने शेतकरी संकटात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:29 IST2021-01-25T04:29:10+5:302021-01-25T04:29:10+5:30
कोठारी : परिसरातील मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी कापूस पिकाची लागवड केली होती. परंतु त्या कापसाच्या पिकावर बोंड अळीचा हल्ला झाल्याने ...

कोठारी भागात कापसाचे पीक घटल्याने शेतकरी संकटात
कोठारी : परिसरातील मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी कापूस पिकाची लागवड केली होती. परंतु त्या कापसाच्या पिकावर बोंड अळीचा हल्ला झाल्याने कापसाची उतारी घटली. त्यामुळे शेतकरी संकटात
सापडले आहेत.
यावर्षी चालू हंगामात कोठारी परिसरातील शेतकऱ्यांनी नगदी पीक म्हणून कापूस पिकाची लागवड केली. मुळात कापूस पीक नगदी स्वरुपात असले तरी फारच खर्चिक पीक आहे. त्यातही यावर्षी प्रमाणापेक्षा जास्त पाऊस आणि सततच्या ढसाळ वातावरणामुळे कपाशी पिकावर रोगाचा प्रादुर्भाव जास्त झाल्याने शेतकऱ्यांना फवारणी खर्च, रासायनिक खतांचा खर्च, मजुरांचा खर्च अधिक झालेला आहे आणि त्यात अती पावसामुळे डवरणी व खुरपणीचे काम वेळोवेळी होऊ शकले नाही. एवढेच नाही तर कपाशीला बोंडे लहान आणि वेचणीसाठी मजुरांना उरक होत नसल्याने वेचणीचे अमाप दर वाढले. त्यामुळे खर्चात अवाढव्य भर पडली. त्यातच सिटीच्या नावाने विकण्यात आलेल्या या बियांण्यामथ्ये बिटी जीवाणूचे गुणधर्म आढळून आले. त्यामुळे शेतकरी पुरता अडचणीत सापडला.
सदर बियांपासून लागवड झालेल्या कपाशीच्या झाडांना लागलेल्या बोंडामध्ये बिटी जीवाणू गुणधर्म नाही. त्यामुळे बोंड अळीचा प्रतिकार करण्याची क्षमता पिकात नाही. परिणामी ८० टक्के बोंडे खराब झाली. यात शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. या परिस्थितीला बिटी बियाणे विकणाऱ्या कंपन्या जबाबदार असून, त्यांनी शेतकऱ्यांची सरळ सरळ फसवणूक केल्याचे दिसून येते.
शासनाने या गंभीर विषयाची दखल घेऊन बिटी नावाने बोगस बियाणे विकणाऱ्या कंपन्यांवर योग्य कारवाई करावी. नुकसानाची योग्य ती भरपाई देण्यात यावी, अशी मागणी परिसरातील शेतकरी सुनील फरकडे, संतोष ईटनकर, अनिल मुंढे, अजय तोटावार, राजकुमार परेकर, संजय गुरु, राजू जुनघरे, प्रीतम गिरटकर, सुभाष साळवे, धनराज हिवरे यांनी केली आहे.