तहसीलवर शेतकऱ्यांची धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2016 00:33 IST2016-06-23T00:33:52+5:302016-06-23T00:33:52+5:30
पिढ्यान्पिढ्या शेती कसत असूनही वनविभाग शेतकऱ्यांना दमदाटी करून नाहक त्रास देत आहे. वनविभागाची ही दंडेली थांबवा,...

तहसीलवर शेतकऱ्यांची धडक
मागणी : वनविभागाची दंडेली थांबवा
नागभीड : पिढ्यान्पिढ्या शेती कसत असूनही वनविभाग शेतकऱ्यांना दमदाटी करून नाहक त्रास देत आहे. वनविभागाची ही दंडेली थांबवा, यासाठी तालुक्यातील बोंड येथील जवळपास ७० शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयावर धडक देऊन तहसीलदारांना साकडे घातले.
बोंड येथील जवळपास ७० ते ८० शेतकरी २००५ व त्या अगोदरपासून वन्यप्राप्त जागेत अतिक्रमण करून वहिवाट करीत आहेत. या अतिक्रमित जमिनीस ग्राम वनहक्क समिती बोंड यांच्याकडून मान्यता मिळावी, यासाठी ग्रामसभेच्या ठरावासह वरिष्ठ पातळीवर प्रस्ताव पाठविण्यात आला. परंतु यासंदर्भात कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.
आता हंगाम सुरू होताच या शेतकऱ्यांनी या जमिनीवर पेरणीचे काम सुरू करताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी या शेतकऱ्यांना पेरणी करण्यास मज्जाव केला. या सर्व शेतकऱ्यांनी १८ जून रोजी बोंड येथील ग्रामपंचायत कार्यालयात सभा घेतली. यानंतर बुधवारी सर्व शेतकऱ्यांनी येथील तहसील कार्यालयावर धडक देवून वनविभागाची दंडेली थांबविण्याची मागणी केली. लोकांची मागणी लक्षात घेऊन तहसीलदार समीर माने, तळोधीच्या वनपरिक्षेत्राधिकारी अभिलाषा रामटेके यांना चर्चेसाठी बोलावून चर्चा केली असता ३१ लोकांचे अतिक्रमण अनधिकृत असून त्यांच्यावर कारवाई करणार असल्याचे सांगितले. दरम्यान आमचे अतिक्रमण अधिकृत करण्यात यावे, या मागणीसाठी शेतकरी आमरण उपोषण करणार, असे शेतकऱ्यांनी सांगितले. (तालुका प्रतिनिधी)