वैभवसंपन्न गावतलाव अतिक्रमणाच्या विळख्यात
By Admin | Updated: April 8, 2016 00:58 IST2016-04-08T00:58:00+5:302016-04-08T00:58:00+5:30
शहरात अतिक्रमण वाढत आहे. आता गावतलावसुद्धा अतिक्रमणाच्या विळख्यात सापडले आहे.

वैभवसंपन्न गावतलाव अतिक्रमणाच्या विळख्यात
संबंधितांचे दुर्लक्ष : तलावाच्या पाळीवर घरांचे बांधकाम
सावली : शहरात अतिक्रमण वाढत आहे. आता गावतलावसुद्धा अतिक्रमणाच्या विळख्यात सापडले आहे. अंदाजे ५६ एकर जमीन या तलावात आहे. आजूबाजूचे शेतकरीदेखील तलावाच्या जागेचा वापर करुन हळूहळू अतिक्रमण करीत आहे.
तलावाच्या पाळीवर घरे होत आहेत. पाळी शेजारी गुरांढोरासाठी गोठ्याचे बांधकाम कच्चे स्वरूपात झालेले दिसते. नगरपंचायतीने याकडे दुर्लक्ष केल्यास एक दिवस तलावच दिसणार नाही.
शहराला लागून असणारा हा गावतलाव मध्यभागी आहे. या तलावाला वैभवाची परंपरा लाभली आहे. महिला-पुरुष मंडळी दरवर्षी गौरी विसर्जन, गणेश, शारदा विसर्जन याच तलावात करतात. शहरातील असंख्य महिला याच तलावात कपडे धुतात. बैलांना पाणी व आंघोळीसाठीही याच तलावाचा वापर केला जातो. पूर्वी शंकरपट याच तलावात भरत होते. मोठ्या प्रमाणात बैलांची व माणसांची गर्दी राहायची. वैभवसंपन्न असणाऱ्या हा तलाव आज उपेक्षिताचे जिणे जगत आहे.
या तलावाचा फायदा अनेक शेतकऱ्यांना व्हायचा. पण आता अनेक जमिनी अकृषक होवून तेथे ले-आऊट पाडले आहेत. जिथे हिरवेगार पिक दिसायचे, तिथे सिमेंटच्या इमारती दिसतात. काही मोजक्या शेतकऱ्यांना आता या तलावाचा फायदा होतो. गोसीखुर्दचे पाणी मिळणार असल्याने हा तलाव उपेक्षितच राहणार आहे. या अगोदरच्या ग्रामपंचायत कमेटीने अनेकदा ठराव घेऊन शासकीय कार्यालये, निवासस्थाने तलावाच्या वरच्या भागात झाली पाहिजे, क्रीडांगण झाले पाहिजे, यासाठी प्रयत्न केला. पण त्यांचे प्रयत्न अपुरे ठरले. शासकीय कार्यालये, निवासस्थाने यासाठी सावली नगरात जागेची कमतरता आहे. गाव तलावाच्या जागेचा वापर केल्यास शासकीय कार्यालये व निवासस्थाने शहरातच होवू शकतात. यासाठी नगरपंचायतने पुढाकार घ्यावा, अशी सावली नगरवासीयांची मागणी आहे. (शहर प्रतिनिधी)