जीव मुठीत घेऊन राहतात वेकोली कामगारांचे कुटुंबीय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:18 IST2021-07-08T04:18:58+5:302021-07-08T04:18:58+5:30
कोल इंडिया कोळसा खाणीत उपक्षेत्रीय स्तरावर व वणी क्षेत्रात वार्षिक सुरक्षा सप्ताहाचे आयोजन करून कामगारांना सुरक्षाचे धडे देतात. ...

जीव मुठीत घेऊन राहतात वेकोली कामगारांचे कुटुंबीय
कोल इंडिया कोळसा खाणीत उपक्षेत्रीय स्तरावर व वणी क्षेत्रात वार्षिक सुरक्षा सप्ताहाचे आयोजन करून कामगारांना सुरक्षाचे धडे देतात. त्यावर लाखो रुपये खर्च केले जातात. कामगारांच्या सुरक्षेबरोबरच कुटुंबीयांच्या सुरक्षेबाबत कटिबद्ध ठासून सांगतात. प्रत्यक्षात मात्र सुरक्षा नियमांची पायमल्ली करून कोळसा उत्पादन हेच लक्ष्य व धोरण राबविण्यात येत आहे. वणी क्षेत्रात विविध मान्यताप्राप्त ट्रेंड युनियन असल्या तरी कामगारांच्या विविध समस्या सोडविण्यास अपयशी ठरत असल्याचा आरोप होत आहे.
मागील सुमारे ३० वर्षांपूर्वी घुग्घुस क्षेत्रात ठिकठिकाणी कामगारांसाठी दुमजली, एलसीएच, राजीव काॅलनी, हेल्मेट क्वाॅर्टर अशा विविध कामगार वसाहतींची निर्मिती करण्यात आली. त्या जीर्ण झालेल्या आहेत. क्वाॅर्टरच्या भिंतीचे प्लास्टर, छताचे सिलिंग व सिलिंग पंखे तुटून पडत आहेत. वास्तव्यास असलेल्या क्वाॅर्टरचे दरवाजे, खिडक्या, शौचालयाचे दरवाजे तुटलेले आहेत. सांडपाणी वाहून नेणाऱ्या नाल्या वाहत नाहीत. जिकडे तिकडे घाण पाणी साचून दुर्गंधी येत आहे. या ठिकाणी वास्तव्यास असलेले कामगार कुटुंब जीव मुठीत घेऊन जगत आहे. अनेकदा वरच्या मजल्याचे जिने खचण्याचे प्रकार घडले आहेत. रस्त्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याने खड्ड्यातून रस्ता शोधावा लागत आहे. वेकोली कामगार वसाहत समस्यांचे माहेरघर बनली आहे.