निधीअभावी हागणदारीमुक्तीला गालबोट

By Admin | Updated: January 4, 2016 03:33 IST2016-01-04T03:33:27+5:302016-01-04T03:33:27+5:30

स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत बल्लारपूर तालुका विदर्भात पहिल्यांदा हागणदारीमुक्त करण्याचा संकल्प जिल्हा परिषद

False freed money | निधीअभावी हागणदारीमुक्तीला गालबोट

निधीअभावी हागणदारीमुक्तीला गालबोट

संकल्पाला तडा : नादुरुस्त शौचालयामुळे निर्माण होत आहे अडचण
अनेकश्वर मेश्राम ल्ल बल्लारपूर
स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत बल्लारपूर तालुका विदर्भात पहिल्यांदा हागणदारीमुक्त करण्याचा संकल्प जिल्हा परिषद पंचायत समितीने केला आहे. हागणदारीमुक्त तालुका प्रत्यक्षात आणण्यासाठी १६०० कुटुंबाचे नादुरुस्त शौचालयाचे बांधकाम पूर्ण होणे गरजेचे आहे. मात्र यासाठी सीएसआर निधीची आवश्यकता असून निधीअभावी तालुका हागणदारीमुक्तीला गालबोट लागण्याची शक्यता बळावली आहे. अशीच काहीसी परिस्थिती जिल्ह्यातील इतर तालुक्यातही आहे.
बल्लारपूर तालुक्यात एकूण १७ ग्रामपंचायती आहेत. येथील एकूण ९ हजार ९०६ कुटुंब संख्यापैकी ९ हजार ३५४ कुटुंबाने वैयक्तीक शौचालयाचे बांधकाम करुन वापरात आणले आहे. तरीही आजघडीला ५५२ कुटुंबाने शौचालयाचे बांधकाम अद्याप सुरु केले नाही. निरायम आरोग्य जगण्यासाठी स्वच्छता अभियान महत्वाचा घटक आहे. यासाठी प्रशासन प्रयत्नशील असून जनजागृती करीत आहे. स्वच्छतेचा बल्लारपूर पॅटर्न विदर्भातील पहिला ठराव, यासाठी पदाधिकारी अधिकारी व गावकरी समन्वयातून नागरिकांना प्रोत्साहित करीत आहेत. या मोहिमेला जिल्हा परिषद प्रशासनही साथ देत आहे.
स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबा व राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या स्वप्नातील ग्रामीण भारत स्वच्छतेचा संकल्प आकारास येत आहे. प्रत्येक घरी शौचालय बांधकाम करुन उघड्यावर शौचास जाणाऱ्यांना प्रतिबंध लावण्यात येत आहे.
यासाठी गावागावात लोकसहभाग काही प्रमाणात दिसून येत आहे. लोकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी तालुक्याच्या ग्रामीण भागात स्वच्छता कार्ड स्वत: लावण्याचा प्रसंग जागरुकता निर्माण करुन प्रेरणा देणारा ठरला आहे.
विदर्भात स्वच्छतेचा बल्लारपूर पॅटर्न आकारास येत असला तरी तालुक्याच्या ग्रामीण भागात १ हजार ६०० कुटुंबाकडे नादुरुस्त व वापरात नसलेल्या शौचालयाची संख्या उघड झाली आहे.
याला कारणीभूत शासनाचे कमी अनुदान ठरले आहे. परिणामी नादुरुस्त शौचालयाचे बांधकाम करुन उघड्यावर शौचास जाऊ नये, यासाठी निधीची तरतूद करवी म्हणून पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना साकडे घालण्यात आले आहे. पंचायत समिती स्तरावर ठराव पारित करुन वेकोलि, बिल्ट ग्राफीक्स पेपर प्रा. ली. कडे निधीची मागणी सामाजिक दायित्व विभागांमार्फत करण्यात आली.
मात्र सीएसआर निधीअभावी संपूर्ण तालुका हागणदारीमुक्त होण्यास अडचण निर्माण झाली आहे. परिणामी स्वच्छ भारत मिशन ग्रामीण संकल्पना आकारास येणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

विद्यार्थ्यांचे तयार करणार गुड मार्निंग पथक
नागरिकांना स्वच्छतागृहांची सवय लागावी, शौचालय वापराचे महत्व कळावे. उघड्यावर शौचास जाणाऱ्यात संकोच निर्माण व्हावा. स्वच्छता अभियानाची फलश्रुती करण्यासाठी शालेय विद्यार्थ्याचे गुड मार्निंग पथक तयार करण्याची योजना संवर्ग विकास अधिकारी बी.बी. गजभे, गटशिक्षणाधिकारी संजय हेडावू यांनी आखली आहे. या पथकाच्या माध्यमातून गावागावात भल्या पहाटे उघड्यांवर शौचास जाण्यांचा गांधीगिरी पद्धतीने गुलाब पुष्प देऊन जागृती केली जाणार आहे.

अशी आहेत नादुरुस्त शौचालये
कोठारी येथे ६५, इटोली १५०, नांदगाव (पोडे) ६५, हडस्ती ४१. गिलबिली १७६, किन्ही ७०, लावारी ८९, कळमना १५८, पळसगाव ९१, आमडी २८, दहेली ६८, कोर्टिमक्ता ८८, काटवली (बामणी) ७१. बामणी (दुधोली) ५१. मानोरा १०३, विसापूर १५७ कवडजई १३९ असे एकूण १७ ग्रामपंचायतीच्या १६०० कुटुंबांकडे नादुरुस्त व वापरात नसलेले शौचालय आहे.

स्वच्छ महाराष्ट्र अभियान आरोग्यासाठी महत्वाचे आहे. या अभियानात बल्लारपूर तालुक्याचे लाभ अन्य तालुक्याच्या तुलनेत समाधानकारक आहे. नादुरुस्त शौचालयाचा प्रश्न निर्माण झाला असला तरी तालुक्याला हागदारीमुक्त करण्यासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही. अनेक प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न शासन स्तरावरुन केला जात असून हागणदारीमुक्त तालुका करण्यासंदर्भात निधीची पूर्तता करण्यात येईल.
- सुधीर मुनगंटीवार
पालकमंत्री चंद्रपूर

Web Title: False freed money

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.