नांदा येथील रास्तभाव दुकान कायमचे रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 04:27 IST2020-12-22T04:27:50+5:302020-12-22T04:27:50+5:30
कोरपना : कोरपना तालुक्यातील नांदा येथील रास्तभाव दुकानदाराकडून मागील सहा वर्षापासून सातत्याने शिधापत्रिकाधारकांची लुट करुन काळाबाजारी केली जात ...

नांदा येथील रास्तभाव दुकान कायमचे रद्द
कोरपना : कोरपना तालुक्यातील नांदा येथील रास्तभाव दुकानदाराकडून मागील सहा वर्षापासून सातत्याने शिधापत्रिकाधारकांची लुट करुन काळाबाजारी केली जात होती. २०१५ व २०१७ मध्ये दोनदा रास्तभाव दुकान रद्द करण्यात आले होते. मात्र जिल्हा पुरवठा विभागाने दंड वसूल करुन अनेकदा संधी दिल्यानंतरही काळाबाजारी करणे बंद न केल्याने नांदा येथील रास्तभाव दुकानाचा परवाना जिल्हा पुरवठा अधिकारी सुरेन्द्र दांडेकर यांनी कायम स्वरुपी रद्द केला आहे.
किसन गोंडे नामक स्वस्त धान्य दुकानदाराकडे नांदा येथील दुकान होते. डिसेंबर २०१४ मध्ये अन्नसुरक्षा कायदा अमलात आला. शिधापत्रिकाधारकांना लाभ देण्याऐवजी नांदा व नांदाफाटा येथील रास्तभाव दुकानदारांनी शिधापत्रिकाधारकांची मोठी आर्थिक लूट केली. २०१५ मध्ये चौकशीअंती येथील रास्तभाव दुकान जिल्हा पुरवठा अधिकार्यांनी रद्द केले होते. रास्तभाव दुकानदारने विभागीय आयुक्तांकडे अपील करुन उपजीविकेकरिता रास्तभाव दुकानाशिवाय इतर व्यवसाय नसल्याने पुन्हा चुका करणार नसल्याचे हमीपत्र लिहून दिल्याने शासनाने परत रास्तभाव दुकान बहाल केले. संधीचा सदुपयोग करण्याऐवजी सातत्याने लुट सुरुच ठेवली. जिल्हा पुरवठा विभागाने आर्थिक दंड लावूनही सुधारणा होत नसल्याने २०१७ मध्ये किसन गोंडे यांचा परवाना रद्द केला. आणखी दुकान परत आणण्यात गोंडे यशस्वी झाले.
अपंग व्यक्तीला धान्य न देणे, मुलगा व सुन दोघेही जिल्हापरीषद शिक्षक असताना त्यांच्या नावाने धान्य उचलणे, आगाऊचे पैसे घेणे, काळाबाजारी करणे किसन गोंडे यांनी सुरुच ठेवल्याने उशीरा का होईना जिल्हा पुरवठा अधिकार्यांनी नांदा येथील रास्तभाव दुकान रद्द करुन किसन गोंडे यांना चांगलाच दणका दिला आहे. नांदा येथील रास्तभाव दुकान महिला बचत गटाला देऊन काळाबाजारी करणार्याची मक्तेदारी कायमची संपविण्याची मागणी महिलांनी केली आहे.