सामाजिक परिवर्तन करणारा किमयागार शिक्षक
By Admin | Updated: September 5, 2016 00:57 IST2016-09-05T00:57:28+5:302016-09-05T00:57:28+5:30
शिक्षक हा ज्याप्रमाणे शिक्षण प्रक्रियेतील कर्णधार असतो; त्याचप्रमाणे तो सामाजिक परिवर्तन करणारा किमयागारही असतो.

सामाजिक परिवर्तन करणारा किमयागार शिक्षक
भूृमिका महत्त्वाची : सरकारने विचार करण्याची गरज
मंगल जीवने बल्लारपूर
शिक्षक हा ज्याप्रमाणे शिक्षण प्रक्रियेतील कर्णधार असतो; त्याचप्रमाणे तो सामाजिक परिवर्तन करणारा किमयागारही असतो. म्हणून भारताला महासत्ता बनायचे असेल तर, शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या शिक्षकांची भूमिका अतिशय महत्त्वाची राहणार आहे.
गुरुपरंपरेचा थोर वारसा प्राचीन काळापासूनच देशाला लाभला आहे. समाजसुधारकांनी शिक्षणाचे महत्त्व समाजातील सर्वच स्तरापर्यंत पोहोचविण्याचा अथक प्रयत्न केला. त्यामध्ये महात्मा ज्योतीराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे कार्य या पार्श्वभूमीवर अद्वितीय स्वरुपाचे ठरले. आपल्या प्रकांड बुद्धिमत्तेचा ठसा परदेशातील शिक्षण संस्थावर उमटवणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शैक्षणिक विद्वत्तेमुळे आधूनिक भारताचे घटनाकार बनले. म्हणून शिक्षण व शिक्षकाचे महत्त्व वाढत चालले आहे.
शिक्षक दिन हा तसा शिक्षकांचे कौतुक करण्याचा मानसन्मानाचा दिवस म्हणूनच अलीकडच्या काळात ओळखला जातो. कोवळ्या वयातील विद्यार्थ्यांपासून तर महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या तरुणांनाही प्रभावीत करण्याचे कौशल्य शिक्षकांमध्ये असते. सर्वच वयोगटातील मुलांना सुयोग्य आकार देण्यासाठी तो सातत्याने धडपडतो. बरेच विद्यार्थी एकवेळ आपल्या पालकांचे ऐकत नाहीत; पण आपल्या शिक्षकांचे ऐकतात. ऐवढा विश्वास शिक्षकी पेशात असतो. एवढे असूनही शिक्षकांच्या प्रश्नावर सातत्याने चालढकल करण्याची मानसिकता असणारे प्रशासन या शिक्षकदिनी शिक्षकांना आवडेल, अशी एखादी घोषणा करण्याची संधी देखील साधत असते. मात्र शिक्षक दिवस संपला की, शिक्षक स्नेही माहोल वर्षभर दिसून येत नाही. कारण टीचर्स एक्सलन्सी सेंटरच्या माहितीनुसार कार्यरत शिक्षकांपैकी ७३.३ टक्के शिक्षक दबावाखाली काम करीत असल्याचा विषय राष्ट्रात चिंतेचा बनला आहे. जर असे असेल तर त्यांच्याकडून सर्वोकृष्ठ कामगिरीची अपेक्षा ठेवायची का? असा प्रश्न पडतो आहे. दबावरहित वातावरणातून शिक्षक मुक्त झाला तर विद्यार्थ्यांमधील सुप्तगुणांना अधिक विकसीत करण्याची संधी यानिमीत्याने शिक्षकांना मिळेल व शिक्षक दिनी असणारे शिक्षकस्नेही वातावरण सदैव राहण्यासाठी विचार करणे आवश्यक आहे.