बनावट सोने विकणारी टोळी जेरबंद

By Admin | Updated: March 12, 2016 01:13 IST2016-03-12T01:13:08+5:302016-03-12T01:13:08+5:30

बनावट सोने विकण्याचा प्रयत्न करणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली.

Fabrication of Gold Gold | बनावट सोने विकणारी टोळी जेरबंद

बनावट सोने विकणारी टोळी जेरबंद

महिलेचा समावेश : स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
चंद्रपूर : बनावट सोने विकण्याचा प्रयत्न करणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. यापैकी दोघांना गुरूवारी सायंकाळी तर एका महिलेला शुक्रवारी सकाळी अटक करण्यात आली.
गंगाराम मंगल सोलंकी (३२), प्रभू राजाराम गुजराती (३३) व जमनाबाई रणछोड सोलंकी (६५) अशी अटक करण्यात आलेल्या टोळीतील सदस्यांची नावे असून हे सर्वजण न्यू येरखेडा कामठी (जि.नागपूर) येथील रहिवासी आहेत. यासंदर्भात शुक्रवारी पोलीस उपअधीक्षक (गृह) जयेंद्र काटे, परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक सुशिलकुमार नायक, रामनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक संपत चव्हाण, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन कंकाळे यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद घेण्यात आली. त्यात या घटनेसंदर्भात माहिती देण्यात आली.
पोंभुर्णा येथील जनरल स्टोअर्सचा चालक दिनेश खोब्रागडे याच्याकडे ८ मार्चला एक इसम आला होता. मला खोदकाम करताना दीड किलोचा सोन्याचा हार सापडला. मी गरीब असून मुलीचे लग्न असल्याने मला तो विकायचा आहे. तुम्ही उद्या चंद्रपूरला या मी तुम्हाला सोन्याचा हार दाखवितो, असे त्याने दिनेशला सांगितले. दिनेश पूर्वी भद्रावती येथील ट्रान्सपोर्ट व्यावसायिक अनमोल कोल्हटकर यांच्याकडे नोकरीला होता. त्यामुळे त्याने भद्रावती येथे जाऊन अनमोल कोल्हटकर यांना सोन्याच्या हाराबाबत माहिती दिली. त्यानंतर दिनेश त्याचा मित्र पारस कुळवे याला घेऊन चंद्रपूरला आला. येथे पोहोचल्यानंतर त्याने सोन्याचा हार विकायचा असल्याचे सांगणाऱ्या इसमाला फोन लावला. त्याने लगेच त्यांना जुनोना चौकात बोलाविले. तेथे एका महिलेसह तिघेजण उपस्थित होते. त्यातील महिलेने दिनेशला सोन्याचा हार दाखवून त्यातील एक सोन्याचा मणी देऊन तो तपासून पाहण्याबाबत सांगितले. सोनाराकडे जाऊन तपासणी केली असता, तो सोन्याचाच असल्याचे सिद्ध झाले. बाजारात त्या सोन्याच्या हाराची किंमत ३० लाख रुपये असली तरी गरजेपोटी आम्ही तो आठ लाख रुपयात देऊ, असे या टोळीतील सदस्यांनी दिनेशला सांगितले. मात्र एवढे पैसे देण्याची दिनेशची ऐपत नसल्याने त्याने ही बाब अनमोल कोल्हटकर यांना सांगितली. मात्र कोल्हटकर यांना याबाबत संशय आल्याने त्यांनी चंद्रपूर येथे येऊन घडलेल्या प्रकाराची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन कंकाळे यांना दिली.
ठरल्याप्रमाणे १० मार्चला चंद्रपूरलगतच्या जुनोना परिसरात हा व्यवहार होणार होता. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचला. बऱ्याच घडामोडीनंतर महाकाली मंदिर परिसरात देवाण-घेवाणीचा व्यवहार करण्याचे ठरले.
त्यानुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे पथक महाकाली मंदिर परिसरात दाखल झाले. तेथील शनी मंदिरामागे टोळीतील महिला स्वत:जवळील नॉयलॉनच्या पिशवीतील नकली हार काढून दिनेशला दाखवीत असतानाच दबा धरून बसलेल्या पोलिसांनी आरोपींना अटक केली.
या प्रकरणी या टोळीविरुद्ध भादंवि ४२०, ३४, ५११ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप दिवाण, अपर पोलीस अधीक्षक हेमराजसिंह राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन कंकाळे, पोलीस उपनिरीक्षक सुनिल उईके, सहाय्यक फौजदार दौलतराव, जमादार गजानन निमकर, संगीडवार, राजकुमार देशपाडे, नायक पोलीस शिपाई अरूण खारकर, पोलीस शिपाई गणेश भोयर, संदीप बुरडकर, विजय वैद्य, महिला पोलीस शिपाई संचिता गावंडे यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.
(प्रतिनिधी)

अन् पोलीस निरीक्षक बनले सोनार
गुन्ह्याचा तपास करताना अनेकदा पोलिसांना वेशभूषा करून अभिनय करावा लागतो. या घटनेतही तसेच झाले. बनावट सोने विकणाऱ्या टोळीला जेरबंद करण्यासाठी आखलेल्या व्यूहरचनेत पोलीस उपनिरीक्षक सुनील उईके यांनी सोनाराची भूमिका निभावली. पोलीस असल्याचा कुठेही संशय येऊ न देता त्यांनी आपली कामगिरी फत्ते केली.

 

Web Title: Fabrication of Gold Gold

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.