प्रेमीयुगुलांच्या एकांतावासावर विकृत टोळक्यांची नजर
By Admin | Updated: July 7, 2015 00:57 IST2015-07-07T00:57:59+5:302015-07-07T00:57:59+5:30
शाळा, महाविद्यालयीन शिक्षण घेताना मुलांचा मुलींशी संपर्क येतो. यातूनच त्यांची मैत्री होते..

प्रेमीयुगुलांच्या एकांतावासावर विकृत टोळक्यांची नजर
रुपेश कोकावार बाबुपेठ (चंद्रपूर)
शाळा, महाविद्यालयीन शिक्षण घेताना मुलांचा मुलींशी संपर्क येतो. यातूनच त्यांची मैत्री होते आणि पुढे मैत्रीचे रुपांतर प्रेम संबधात होते. मग महाविद्यालयातील गर्दीतून वाट काढत ही तरूणाई एकांताच्या शोधात शहराबाहेर जाऊ लागते. सध्या असे प्रेमीयुगुलांची जोडपी जंगल परिसरात फिरताना दिसून येत आहेत. मात्र हा एकांत त्यांच्या जीवावरही बेतू शकतो. होय, अशाच प्रेमीयुगुलांवर काही विकृत प्रवृत्तीच्या टोळक्यांची नजर असून अनेक जोडप्यांना वाईट ‘अनुभव’ आला असला तरी बदनामीच्या भीतीपोटी अनेक प्रकरणे बाहेरच आली नाही. परिणामी विकृतांची हिंमत वाढत आहे.
शाळा, महाविद्यालयांच्या नव्या सत्राला आरंभ झाला आहे. याच निमित्ताने प्रेमीयुगुलांना घरातून बाहेर पडण्याची संधी मिळाली आहे. अनेक प्रेमीयुगुल शाळा, महाविद्यालयाला बुट्टी मारुन एकांताच्या शोधात शहराबाहेर पडू लागले आहेत. शहराबाहेरील काही स्थळे ही निर्जन असून त्या परिसरात रहदारी अतिशय कमी आहे. त्यामुळे एकांतासाठी प्रेमीयुगुल अशा स्थळांना पसंती देतात. पण आता याच प्रेमीयुगुलांवर काही विकृत प्रवृत्तीच्या टोळक्याची नजर आहे. निर्जन परिसरात या टोळक्याला असे प्रेमीयुगुल दिसल्यास त्यांच्या जवळील पैसे, मोबाईल, घड्याळ तसेच महागड्या वस्तू लुटल्या जात आहे. यापूर्वी या टोळ्यांकडून प्रियकाराला मारहाण करुन पे्रयसीवर अत्याचार करण्याच्या घटनाही घडल्या आहे. विशेष म्हणजे, हे प्रेमीयुगुल सर्वांची नजर चुकवून एकांतात गेल्याने अत्याचार झाल्यानंतरही भीतीपोटी त्यांना गप्प रहावे लागत आहे. यातूनच अशा गुन्हेगांराची हिम्मत वाढत आहे. याप्रकारावर आळा घालण्यासाठी पोलीस यंत्रणा प्रयत्न करीत असली तरी पालकांनीही याविषयात सावध असावे, असे आवाहन पोलिसांकडून केले जात आहे.
जनजागृतीची गरज
कोणतीही मोठी दुर्घटना घडल्यानंतर कँडल मार्च काढून निषेध करण्यापेक्षा ती घटना घडायलाच नको, यासाठी सामाजिक संस्थाकडून शाळा, महाविद्यालयात जनजागृती करण्याची गरज आहे. त्यातून अशा प्रकारावर काही प्रमाणात आळा बसू शकतो.
या भागात सुरू आहे प्रेमीयुगुलांचा वावर
शहराबाहेरील दाताळा, म्हाडा, जुनोना, चिचपल्ली, अजयपूर, जुनोना मार्गे चिचपल्ली, देवाळा, दुर्गापूर आदी ठिकाणे शहरापासून लांब असून येथे लोकवस्ती कमी आहे. या भागात प्रेमीयुगुलांचा जास्त वावर असून या भागात कोणताही गुन्हा घडल्यास कोणाचे लक्ष जात नाही. त्यामुळे या भागात प्रेमीयुगुलांनी जाणे टाळण्याची गरज आहे.
पालकांनी लक्ष देण्याची गरज
घरातून शाळा, महाविद्यालयासाठी निघालेला मुलगा, मुलगी कॉलेजमध्येच गेला ना? याची माहिती पाल्यांना असणे गरजेचे आहे. तो, ती नियमीत कॉलेजला जात आहे, याची खात्री वेळोवेळी करुन घेणे आवश्यक आहे. घरी उशिरा आल्यास कुठे होता, याची विचारपूस करण्याचीही गरज आहे. अन्यथा एखाद्या मोठ्या दुर्घटनेला सामोरे जावे लागेल, याची शक्यता नाकारता येत नाही.
मागील काही गुन्ह्यांवर नजर टाकली तर छेडखानी, लुटमार, अत्याचार यासारखे मोठे गुन्हे निर्जनस्थळी घडल्याचे निदर्शनास येते. अशा प्रेमीयुगुलांना टारगेट करुन एकांताचा फायदा घेत त्यांच्यावर शारिरीक अत्याचार तसेच त्यांच्याजवळून वस्तू लुटणाऱ्या काही टोळ्या फिरत आहेत. त्यामुळे प्रेमीयुगुलांनी अशा निर्जनस्थळी जाणे टाळावे. यामुळे अशा घटनांवर आळा घालता येईल. आपण स्वत: अशा भागात गस्त घालत असून आठवडाभरात निर्जनस्थळी फिरणाऱ्या ११ जोडप्यांवर कारवाई करण्यात आली आहे.
- वर्षा खरसान, पोलीस उपनिरीक्षक
(महिला तक्रार निवारण केंद्र)