शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे
By Admin | Updated: July 10, 2017 00:27 IST2017-07-10T00:22:02+5:302017-07-10T00:27:39+5:30
पावसाच्या प्रतीक्षेत आभाळाकडे पाहणाऱ्या शेतकऱ्यांचे डोळे थकले. याच थकलेल्या नजरेने अजूनही तो पाऊस येण्याची वाट पाहत आहे.

शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे
दुबार पेरणीचे संकट : बा पावसा का कोपलास ?
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : पावसाच्या प्रतीक्षेत आभाळाकडे पाहणाऱ्या शेतकऱ्यांचे डोळे थकले. याच थकलेल्या नजरेने अजूनही तो पाऊस येण्याची वाट पाहत आहे. परंतु पाऊस शेतकऱ्यांना हुलकावणी देत निघून जात आहे. आज-उद्या पाऊस पडेल या आशेवर शेतकरी होते. मात्र पावसाने शेतकऱ्यांना ऐनवेळी दगा दिला. त्यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने पाहिलेले स्वप्न मातीमोल झाले असून पावसाअभावी पेरण्या हातून जाण्याची भीती शेतकऱ्यांना आहे. त्यामुळे त्याच्या काळजाची धडधड वाढायला लागली असून अनेकांवर दुबार पेरणीचे संकट घोंगावत आहे.
कृषीप्रधान देशातील शेती आज बिनभरवशाची झाली आहे. पावसाअभावी शेतीला अवकळा आली आहे.
सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहायला तयार नाही. निसर्ग शेतकऱ्यांना साथ देत नाही. जगाच्या पोशिंद्यावर आज आलेले संकट फार मोठे आहे. शेतकऱ्यांनी जगावे की मरावे एवढी शेतकऱ्याची बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. निसर्गाच्या पाण्यावर शेती करायचे दिवस आज संपले आहे. निसर्ग पूर्वीसारखा शेतकऱ्यांना साथ देत नाही.
त्यामुळे शेतकऱ्यांवर कर्जाचा डोंगर दिवसेंदिवस वाढतो आहे. यावर्षी चांगला पाऊस पडेल या एकाच भरवशावर शेतकऱ्यांनी उसनवारी व कर्ज काढून कशीबशी शेती केली. हवामान खात्यानेही यावर्षी चांगला पाऊस पडेल, असा अंदाज वर्तविला होता. थेट हवामान खात्याचा अंदाज चुकीचा ठरवित यावेळी पावसाने दगा दिला. पावसाअभावी शेतकऱ्यांनी पेरणी केलेले महागडे बियाणे मातीमोल झाले. शेतकऱ्यांनी दुबार-तिबार पेरणी केली. परंतु अपुऱ्या पावसाने पेरणी केलेले बियाणे मातीतच सडून गेले. त्याचा चांगलाच फटका शेतकऱ्यांना बसला आहे.
आता शेतकऱ्यांजवळ पुन्हा पेरणी करण्यासाठी एक छदामही पैसा शिल्लक उरलेला नाही. शेतकऱ्यांनी नेमकं करायचं काय? असा प्रश्न शेतकऱ्यांना आतून पोखरतो आहे. पावसाअभावी शिवार अजूनही हिरवेगार झाले नाही. जुलै महिन्याचा आठवडा संपून गेला तरी पावसाचा पत्ता नाही. पाऊस शेतकऱ्यांवर का रूसून बसला, हे कळायला मार्ग नाही. पाऊस नसल्याने शेतकऱ्यांनी शेतीची कामे थांबविली आहे. पावसाअभावी जगाचा पोशिंदाच चिंतातूर झाला असून त्याच्या काळजाची धडधड वाढली आहे.
बहुतांश शेती कोरडवाहू
जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी आजही निसर्गाच्या पाण्यावर कोरडवाहू शेती करतात. निसर्गाचे पाणी हेच शेतीचे जीवनामृत आहे. परंतु निसर्ग आज लहरीपणासारखा वागायला लागल्याने निसर्गाच्या पाण्यावर अवलंबून असलेली शेती बिनभरवशाची झाली आहे.
काहींच्या अद्याप पेरण्याच नाही
यंदा खरीप हंगामात एकूण चार लाख ३८ हजार २०२ हेक्टरवर पिकांची लागवड करण्यात येईल, असा कृषी विभागाचा अंदाज आहे. त्यापैकी दोन लाखांहून अधिक हेक्टरवर शेतकऱ्यांनी पेरण्या टाकल्या आहेत. जवळजवळ निम्म्या शेतकऱ्यांनी अद्यापही पेरण्या केलेल्या नाही. पाऊस प्रत्येक नक्षत्रात दगा देत असल्याने शेतकऱ्यांनी हिंमत खचत चालली आहे. ज्यांनी पेरण्या केलेल्या आहेत, त्यांच्या पेरण्या पावसाअभावी नष्ट होत आहे.