ब्रह्मपुरीवासीयांचे डोळे अजूनही आभाळाकडे

By Admin | Updated: August 13, 2015 01:49 IST2015-08-13T01:49:03+5:302015-08-13T01:49:03+5:30

आॅगस्ट महिन्याचा मध्य कालखंड संपत आला. पाऊस पडण्याचे महिने उतरत आहेत.

The eye of Brahmapuri is still in the sky | ब्रह्मपुरीवासीयांचे डोळे अजूनही आभाळाकडे

ब्रह्मपुरीवासीयांचे डोळे अजूनही आभाळाकडे

पाऊस नसल्याने शेतकऱ्यांसह सर्वच बेजार : १३ हजार हेक्टर जमिनीवरील रोवणी खोळंबली
ब्रह्मपुरी : आॅगस्ट महिन्याचा मध्य कालखंड संपत आला. पाऊस पडण्याचे महिने उतरत आहेत. पाऊस आज पडेल या आशेत सर्वच जनता आसुसलेली आहे. आकाशात दररोज मेघ दाटून येतात. परंतु पावसाचा थंगपत्ता नाही. त्यामुळे ब्रह्मपुरी तालुकावासीयांचे डोळे आजही आभाळाकडे लागले असल्याचे विदारक चित्र तालुक्यात सर्वत्र दिसून येत आहे.
कधी नव्हे एवढी पाण्याबाबतची भीषणत: यावर्षी या तालुक्यात निर्माण झाली आहे. तालुक्यात एकूण रोवणी क्षेत्र १५ हजार हेक्टर आहे. त्यापैकी आतापर्यंत फक्त २४६२ हेक्टर शेतजमिनीवर रोवणी झाल्या आहेत. ज्या रोवणी झाल्या त्या मोटारपंपच्या साहाय्याने करवून घेतल्या गेल्या आहेत. पावसाच्या पाण्यावर खऱ्या अर्थाने अजूनही रोवणीची कामे झालीच नाही. आतापर्यंत यावर्षी या तालुक्यात फक्त ५० मि.मी. पाऊस झाला आहे. तर मागील वर्षी या कालखंडात ९० मि.मी. पाऊस पडल्याची नोंद झाली होती. त्यामुळे मागील वर्षी रोवणीची कामे पूर्णत: पार पडली होती. आता मात्र परिस्थिती बिकट होत चालली आहे. शेतकरी वर्ग हातावर हात ठेवून रोज आभाळाकडे टक लावून पावसाची आतुरतेने वाट पाहत आहे. त्याचबरोबर सर्वच पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. बोड्या, नाले, तलाव, पाण्याविना अपूर्ण आहेत. त्यामुळे पाण्याचे भीषण संकट तालुक्यात निर्माण होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. दिवसा प्रचंड उकाडा, कधी उन्ह तर कधी बादल अशी परिस्थिती रोज निर्माण होत आहे. दररोज एखाद्या वेळी आकाशात ढग दाटून येतात. परंतु पाऊस निघून जात असल्याने सर्वांची निराशा होत असल्याचे दिसून येत आहे. अशीच परिस्थिती पुन्हा काही काळ राहिली तर सर्वत्र हा:हाकार माजण्याची शक्यता नाकारता येत नाही. पाऊस अतिशय कमी पडल्याने आरोग्य व इतर साथीच्या रोगांचा प्रादूर्भाव होण्याचीही शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. तालुक्यात अजूनही दमदार पावसाची सर्वांना अपेक्षा आहे. हे स्वप्न हवेत विरणार काय, असा प्रश्नही मनात निर्माण होत आहे. (तालुुका प्रतिनिधी)

Web Title: The eye of Brahmapuri is still in the sky