राष्ट्रसंतांचे विश्वव्यापक साहित्य घराघरांत पोहोचवा
By Admin | Updated: January 11, 2016 01:11 IST2016-01-11T01:11:34+5:302016-01-11T01:11:34+5:30
राष्ट्रसंत साहित्य समाजाला गती व दिशादर्शक आहे. ग्रामगीतेतून उज्ज्वल राष्ट्र निर्माण होताना आदर्श माणूस घडत असतो.

राष्ट्रसंतांचे विश्वव्यापक साहित्य घराघरांत पोहोचवा
बाबुराव वाग्दरकर : पिंपळगाव येथे १४ वे राज्यस्तरीय साहित्य विचारकृती संमेलनाचे उद्घाटन
प्रकाश काळे पिंपळगाव
(कर्मयोगी तुकारामदादा गीताचार्य साहित्य नगरीतून)
राष्ट्रसंत साहित्य समाजाला गती व दिशादर्शक आहे. ग्रामगीतेतून उज्ज्वल राष्ट्र निर्माण होताना आदर्श माणूस घडत असतो. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजाचे समग्र साहित्य विश्वव्यापक असून ते घराघरांत पोहचवण्याचे कार्य कृतियुक्त कार्यकर्त्यांनी स्वयंसेवा तत्वावर करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन पिंपळगाव येथे आयोजित १४ वे राज्यस्तरीय राष्ट्रसंत साहित्य विचारकृती संमेलनात संमेलनाध्यक्ष बाबुराव वाग्दरकर यांनी केले.
राष्ट्रसंत विचार साहित्य परिषद केंद्रीय समितीद्वारा आयोजित संमेलनाचे उद्घाटन राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार अॅड. संजय धोटे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून आदर्श गाव राजगडचे चंदू पाटील मारकवार, ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर, संजय तिळसम्रुतकर, पुणे येथील सामाजिक कार्यकर्ते पंढरीनाथ चंदनखेडे, सरपंच विजय मरस्कोल्हे, तंटामुक्त अध्यक्ष वामनराव गनफडे, पोलीस पाटील प्रशांत नागपूरे, सुनील बोढाले, माजी आमदार मोरेश्वर टेंभुर्डे, झाडीपट्टीच्या बहिणाबाई अंजनाबाई खुणे आदींची उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरुवात ग्रंथदिंडीने करण्यात आली. कार्यक्रमाची भूमिका विषद करताना ग्रामगीताचार्य बंढोपंत बोढेकर म्हणाले, राष्ट्रसंताच्या विचारातून या संमेलनाची निर्मिती झाली असून या माध्यमातून समाज जागृती व आदर्श गावे निर्माण होताना कार्याकर्ते घडत आहे. ही विशेषता असल्याचे सांगितले. यावेळी विचार साहित्य परिषदेद्वारे देण्यात येणारे चैतन्य युवा पुरस्काराचे मानकरी बिबी येथील कवी अविनाश पोईनकर, संध्या पोडे (माजरी), दिलीप डाखरे (नांदेपेरा), अभय घटे (राजुरा), विलास चौधरी (पेंढरी), संजय आवारी (कृष्णानपूर) यांना प्रदान करण्यात आले. प्रास्ताविक विलास उगे यांनी केले. संचालन अॅड. राजेंद्र जेनेकर तर आभार गुणवंत खोरगडे यांनी मानले. कायक्रमाला परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.