शासनाच्या योजना अंतिम घटकापर्यंत पोहोचवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2018 23:25 IST2018-01-13T23:25:12+5:302018-01-13T23:25:36+5:30
शेवटच्या घटकांपर्यंत कल्याणकारी योजना पोहचवून विकासाबरोबरच या घटकांच्या सामाजिक उत्थानाचा मार्ग प्रशस्त करण्यावर शासनाचा भर आहे.

शासनाच्या योजना अंतिम घटकापर्यंत पोहोचवा
आॅनलाईन लोकमत
चंद्रपूर : शेवटच्या घटकांपर्यंत कल्याणकारी योजना पोहचवून विकासाबरोबरच या घटकांच्या सामाजिक उत्थानाचा मार्ग प्रशस्त करण्यावर शासनाचा भर आहे. या योजनांची अंमलबजावणी करणाऱ्या अधिकाऱ्यांनी विकासाचा प्रवाह अंतिम घटकांपर्यंत पोहचेल याची खबरदारी घेण्याचे आवाहन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले.
चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राच्या विस्तारीत प्रकल्पाअंतर्गत सामाजिक दायित्व निधीतून प्रस्तावित विकास कामाच्या भूमिपूजन कार्यक्रम मुधोली येथे पार पडला. या कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाला वरोरा विधानसभा क्षेत्राचे आ. बाळू धानोरकर, माजी मंत्री संजय देवतळे, जि.प. सभापती अर्चना जीवतोडे, भद्रावती पं.स.च्या सभापती विद्या कांबळे, जि.प. सदस्य मारोती गायकवाड, पं.स. सदस्य नाजुका मंगाम, तहसिलदार शितोळे, महाऔष्णिक विद्युत केंद्राचे चव्हाण, भाजप तालुकाध्यक्ष तुळशिराम श्रीरामे, तालुका महामंत्री नरेंद्र जीवतोडे, मुधोलीच्या सरपंच चवरे, कोंडेगावचे सरपंच रवी घोडमारे उपस्थित होेते.
आज विकासाभिमुख योजनांच्या माध्यमातून ग्रामीण क्षेत्रात विकासाला नवी दिशा मिळाली आहे. शुद्ध पेयजल, सिंचनाच्या सुविधा, रोजगाराच्या संधी, परिसर स्वच्छता, स्वास्थ सुविधा व सुदृढ असे जनजीवन जगने प्रत्येकाचे अधिकार असल्याचे ते म्हणाले.
यावेळी आ. धानोरकर यांनी केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून होत असलेल्या विकासाचा परामर्श घेत या विकासामुळे खेडे गाव विविध क्षेत्रामध्ये स्वयंपूर्णतेच्या दिशेने वाटचाल करीत असल्याचे सांगितले. वीज केंद्राच्या सामाजिक दायित्व निधीतून मुधोली येथे रस्ता खडीकरण, घोडपेठ येथील निवासी शाळेकरिता सिमेंट कॉंक्रीट रस्ता, कोंडेगाव येथे सिमेंट नाला बंधारा व खोलीकरण, वायगाव येथे सिमेंट नाला बंधारा व खोलीकरण अशी विविध कामे केली जात आहेत.