खर्च कोटींचा, वाढ पावणेतीन हजारांची
By Admin | Updated: August 2, 2015 01:15 IST2015-08-02T01:15:11+5:302015-08-02T01:15:11+5:30
नागरिकांना शुद्ध, स्वच्छ पाणी मिळावे म्हणून शहरातील वाढीव प्रभागात दरवर्षी नवीन पाइपालाइन टाकण्याची कोट्यवधी रुपयांची कामे करण्यात आली आहेत.

खर्च कोटींचा, वाढ पावणेतीन हजारांची
चंद्रपूर : नागरिकांना शुद्ध, स्वच्छ पाणी मिळावे म्हणून शहरातील वाढीव प्रभागात दरवर्षी नवीन पाइपालाइन टाकण्याची कोट्यवधी रुपयांची कामे करण्यात आली आहेत. मात्र मागील १७ वर्षात केवळ दोन हजार ७६९ नळधारक वाढले आहेत. यासंदर्भात नागपूरच्या डीआरए कन्सल्टन्सी कंपनीने शहरात सर्वेक्षण न करताच अहवाल तयार केला. महापालिकेच्या ३१ जुलैच्या आमसभेत नगरसेवकांनी या अहवालावर आक्षेप नोंदविल्यामुळे चांगलाच गोंधळ उडाला.
शहरात पाइपलाईन टाकण्यासाठी मनपा दरवर्षी ५० लक्ष रुपये खर्च करीत असते. पाइप टाकण्याच्या कामात आतापर्यंत सुमारे १५ ते २० कोटी रुपये खर्च झाले आहेत. मात्र नवीन नळधारकांची संख्या अत्यल्प आहे. यासंदर्भात नागपूरच्या डीआरए कन्सल्टन्सी कंपनीला शहरातील नळधारकांचे सर्वेक्षण करण्याचे काम दिले होते. मात्र या कंपनीने उज्ज्वल कन्स्ट्रक्शन कंपनीकडील नळधारकांची यादी जोडून अहवाल तयार केला. शहरात कुठेही सर्वेक्षण केले नाही. त्यामुळे या कंपनीचा अहवाल खोटा असल्याचा आरोप नगरसेवक संजय वैद्य यांनी केला.
नगरपालिका अस्तित्वात असताना शहरातील पाणीपुरवठ्याचे खासगीकरण करण्यात आले. त्यावेळी शहरातील लोकसंख्या सुमारे दोन- सव्वा दोन लाखांच्या घरात होती. आता लोकसंख्येत वाढ होऊन सव्वातीन लाखांच्या घरात पोहोचल्याने नगरपालिकेचे महानगरपालिकेत रुपांतर झाले. त्यामुळे नवीन नळधारकांची संख्या वाढणे अपेक्षित होते.
परंतु एकूण लोकसंख्येच्या केवळ २५ टक्के लोकांकडे नळजोडणी असल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे कंत्राटदाराकडून आकडा लपविला जात असल्याचा आरोप या आमसभेत नगरसेवकांकडून करण्यात आला. (शहर प्रतिनिधी)