एलबीटीबाबत व्यापाऱ्यांचा अपेक्षाभंग

By Admin | Updated: March 19, 2015 00:59 IST2015-03-19T00:59:17+5:302015-03-19T00:59:17+5:30

चंद्रपुरात महानगरपालिका अस्तित्वात आल्यानंतर स्थानिक संस्था कर (एलबीटी) लागू करण्यात आले.

Expectations of merchants about LBT | एलबीटीबाबत व्यापाऱ्यांचा अपेक्षाभंग

एलबीटीबाबत व्यापाऱ्यांचा अपेक्षाभंग

चंद्रपूर : चंद्रपुरात महानगरपालिका अस्तित्वात आल्यानंतर स्थानिक संस्था कर (एलबीटी) लागू करण्यात आले. मात्र प्रारंभापासूनच व्यापाऱ्यांनी याला दर्शविलेला विरोध आजवर कायमच ठेवला होता. बुधवारी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बजेट सादर करताना एलबीटी रद्दची घोषणा केली. या निर्णयाने व्यापाऱ्यांमध्ये आनंदोत्सव असला तरी १ एप्रिलऐवजी याची अंमलबजावणी १ आॅगस्टपासून होणार असल्याने व्यापाऱ्यांचा अपेक्षाभंग झाला आहे.
चंद्रपुरात एलबीटी लागू करू नये, यासाठी चंद्रपुरातील व्यापाऱ्यांनी जोरदार आंदोलने केली. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेऊन चर्चाही केली होती. विशेष म्हणजे, या एलबीटीविरोधात व्यापारी असोसिएशनने तब्बल एक आठवडा आपली दुकाने बंद ठेवली होती. तरीही चंद्रपूर महानगरपालिका हद्दीत एलबीटी लागू करण्यात आला. एलबीटीपोटी महानगरपालिकेला दर महिन्याला सहा कोटींचे उत्पन्न मिळते, हे विशेष. एलबीटी लागू झाल्यानंतरही व्यापाऱ्यांनी आपला लढा कायमच ठेवला होता. काही दिवसांपूर्वी मुंबई येथे व्यापारी असोसिएशनची बैठकही पार पडली होती. दरम्यान, राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी एलबीटी रद्द करण्याची घोषणा केली. यांसदर्भात चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष हर्षवर्धन सिंघवी यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपुरात एलबीटी रद्द करून व त्या जागेवर कोणताही अधिभार न लावण्याची घोषणा करून व्यापाऱ्यांना खूश केले आहे. मात्र १ एप्रिलपासूनच एलबीटी भरावा लागणार नाही, असे वाटत असताना याच्या अंमलबजावणीसाठी आणखी पाच महिन्याचा कालावधी वाढविण्यात आला, याबाबत खंत आहे. दारूबंदी १ एप्रिलपासून लागू होऊ शकते, तर याच तारखेपासून एलबीटी रद्द का होत नाही, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. यासंदर्भात व्यापारी महासंघाचे अध्यक्ष व चेंबर आॅफ कॉमर्सचे उपाध्यक्ष सदानंद खत्री यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनीही आपला अपेक्षाभंग झाल्याचे सांगितले. वास्तविक १ एप्रिलपासून एलबीटी रद्द करण्यात येईल, असे अपेक्षित होते. मात्र या घोषणेची अंमलबजावणी १ आॅगस्टपासून होत आहे. पाच महिन्यांचा कालावधी मोठा असतो. शिवाय १ आॅगस्टपासून अंमलबजावणी होईलच का, याचीही खात्री देता येत नसल्याचे ते म्हणाले. तुषार एजन्सीचे संचालक विवेक पत्तीवार म्हणाले, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याशी व्यापारी संघटनेने चर्चा केली होते. एलबीटी रद्द होणार, हे अपेक्षित होते. मात्र १ एप्रिलपासून एलबीटी द्यावा लागणार नाही, असे वाटले होते. १ आॅगस्टपासून अंमलबजावणी होणार असल्याने आनंद झाला असला तरी अपेक्षाभंगही झाला आहे. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Expectations of merchants about LBT

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.