मतदानासाठी बाहेर पडा, फरक पडतो
By Admin | Updated: October 14, 2014 23:16 IST2014-10-14T23:16:18+5:302014-10-14T23:16:18+5:30
आपण मतदानाला बाहेर पडत नाही आणि व्यवस्था बदलली नाही, सरकारने काही केले नाही, लोकप्रतिनिधी कामे करीत नाही, असे नेहमी म्हणतो. मी मतदान केले नाही तर काय फरक पडणार,

मतदानासाठी बाहेर पडा, फरक पडतो
दीपक म्हैसेकर : मतदारांना आवाहन
चंद्रपूर : आपण मतदानाला बाहेर पडत नाही आणि व्यवस्था बदलली नाही, सरकारने काही केले नाही, लोकप्रतिनिधी कामे करीत नाही, असे नेहमी म्हणतो. मी मतदान केले नाही तर काय फरक पडणार, असा विचार करुन मतदानाच्या दिवशी सहलीचा आनंद लुटतो. हे सक्षम लोकशाहीला पूरक नसून मतदानासाठी बाहेर पडा, फरक पडतो, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांनी मतदारांना केले आहे.
उद्या १५ आॅक्टोबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील प्रत्येक मतदारांनी मतदानाचा हक्क बजवावा तसेच लोकशाही बळकट करण्यासाठी आपले योगदान मतदानाच्या रुपाने द्यावे, असा संदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे. जिल्ह्यातील शाळा-महाविद्यालयाचे विद्यार्थी प्राध्यापक, डॉक्टर, वकील, व्यापारी व उद्योजक यांनी सर्व प्रथम मतदान करावे व नंतर आपल्या कामासाठी जावे, असे कळकळीचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.
मतदानाची टक्केवारी १०० टक्के व्हावी हा संकल्प सर्वांनी करावे, असेही त्यांनी म्हटले आहे. लोकसभा निवडणूकीत शहरी भागात कमी मतदान झाले. त्यामुळे विधानसभा निवडणुकीसाठी शहरी भागातील मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान करावे. जिल्हा बार असोसिएशनला विनंती करताना, वकील यांचेकडे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीस त्यांनी मतदान करण्यास प्रवृत्त करावे, असे जिल्हाधिकारी म्हटले आहे.
उद्योग क्षेत्रातील सर्व मतदारांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करावे. मतदानाच्या दिवशी उद्योगातील कामगारांना मतदानासाठी सुट्टी देण्यात यावी, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
जिल्हा निवडणूक कार्यालयाने चित्ररथद्वारे मतदार जागृती केली असून हा चित्ररथ गावागावात फिरुन नागरिकांना मतदानाचे महत्त्व पटवून देत आहे. जास्तीत जास्त संख्येने मतदान करावे, यासंबंधीचे पोस्टर, बॅनर व घोषवाक्य या चित्ररथावर अंकीत केले आहेत. समाजातील विविध घटकांच्या भेटी घेऊन जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर प्रयत्न करीत आहेत.
नागरिकांमध्ये जाणीव जागृती व्हावी यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे कलापथकाचे व पथनाट्याचे कार्यक्रम प्रत्येक विधान मतदार संघात सुरु आहेत. नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने मतदान करुन लोकशाही बळकट करावी, असा संदेश पथनाट्याच्या माध्यमातून नागरिकांना दिला आहे. शाळा, महाविद्यालय, अभियांत्रिकी महाविद्यालय व ज्येष्ठ नागरिक अशा विविध ठिकाणी सर्वांनी मतदान करावे. १ जानेवारी २०१४ रोजी वयाची १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या तरुण, तरुणींनी आपला मतदानाचा पहिला अधिकार अवश्य बजवावा, मतदानाने राष्ट्रीय कार्यात हातभार लागतो. त्यामुळे प्रत्येकाने नि:संकोचपणे घरातून बाहेर पडून आपला मतदानाचा अधिकार बजवावा, असे आवाहन केले आहे. (शहर प्रतिनिधी)