धानोरा-भोयगाव पुलाचे अस्तित्व धोक्यातअनेक वर्षांत डागडुजीही नाही : प्रवास झाला धोकादायक

By Admin | Updated: August 13, 2016 00:38 IST2016-08-13T00:38:23+5:302016-08-13T00:38:23+5:30

चंद्रपूर ते गडचांदूर मार्गावरील वर्धा नदीवर बांधण्यात आलेल्या धानोरा-भोयगाव दरम्यानच्या पुलाची अत्यंत दुर्दशा झाली आहे.

The existence of Dhanora-Bhoyaga bridge is not risky in many years: Travel is dangerous | धानोरा-भोयगाव पुलाचे अस्तित्व धोक्यातअनेक वर्षांत डागडुजीही नाही : प्रवास झाला धोकादायक

धानोरा-भोयगाव पुलाचे अस्तित्व धोक्यातअनेक वर्षांत डागडुजीही नाही : प्रवास झाला धोकादायक

चंद्रपूर : चंद्रपूर ते गडचांदूर मार्गावरील वर्धा नदीवर बांधण्यात आलेल्या धानोरा-भोयगाव दरम्यानच्या पुलाची अत्यंत दुर्दशा झाली आहे. मागील अनेक वर्षांपासून सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या पुलाची साधी डागडुजीही झाली नाही. त्यामुळे पुलावरून प्रवास करणे धोकादायक झाले आहे.
पुलावर ठिकठिकाणी सिमेंट उखडल्याने सळाखी दिसत आहेत. तर अनेक ठिकाणी छोटेमोठे खड्डे दिसत आहे. महाड येथील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर या पुलाचे दुरूस्तीचे काम ताबडतोब हाती घेण्याची मागणी चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमेटीचे सचिव उमाकांत धांडे यांनी केली आहे.
सदर पुल होण्यापूर्वी चंद्रपूरवरून गडचांदूरला जाण्याकरिता राजुरा हा एकमेव मार्ग होता. मात्र हे अंतर जास्त असल्याने तथा या मार्गावरील जड वाहतूक चंद्रपूर, बल्लारपूर व राजुरा शहराबाहेरून वळविण्याच्या हेतुने वर्धा नदीवर चंद्रपूर तालुक्यातील धानोरा व कोरपना तालुक्यातील भोयगाव दरम्यान पुलाची मागणी करण्यात आली. चंद्रपूरचे तत्कालीन आमदार तथा पालकमंत्री दिवंगत श्यामबाबु वानखेडे यांनी यांच्या पाठपुराव्यानंतर १९९२-९३ च्या सुमारास हा पुल बांधण्यात आला आणि येवून वाहतुकीकरिता खुला करण्यात आला. या पुलामुळे चंद्रपूर - गडचांदूर हे अंतर बरेच कमी होऊन इंधन व पैशाची बचत तर झालीच शिवाय वर्धा नदी पट्ट्यातील चंद्रपूर, कोरपना आणि राजुरा तालुक्यातील अनेक दुर्गम व अविकसीत राहिलेली गावे परस्परांना जोडल्या जाऊन दळणवळण विकसीत झाले.
गडचांदूर या औद्योगिक शहर परिसरातील अल्ट्राटेक सिमेंट, माणिकगड सिमेंट, अंबुजा सिमेंट, मुरली अ‍ॅग्रो सिमेंट कारखान्यातील सिमेंटची वाहतूक करणारे अवजड वाहने याच मार्गाने धावतात. बांधकाम विभागाच्यावतीने एकीकडे कोट्यवधीची विकास कामे होत असताना सदर पुलाचे महत्व लक्षात घेता या पुलाची साधी देखभाल दुरूस्तीही होऊ शकली नाही, हे विशेष.
काही दिवसांपूर्वी या पुलावरील खड्डयांमुळे दुचाकीवरून पडून एका महिलेचा मृत्यू झाला होता. तर एक दुचाकीस्वार पुलावरून पडून जखमी झाला होता. परिणामी आणखी अपघात होण्याची शक्यता आहे. सदर पुलाची पाहणी करून दुरूस्ती करण्याची मागणी उमाकांत धांडे, दीपक पानघाटे, अरविंद ठाकरे, प्रा. देवराव ठावरी, अशोक वासाडे, विवेक गोखरे, गणेश जोगी, योगेश गोखरे, विनोद वासाडे, विजय वासाडे, राजु गौरकार तसेच परिसरातील नागरिकांनी केली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: The existence of Dhanora-Bhoyaga bridge is not risky in many years: Travel is dangerous

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.