अतिशय कष्टाने दारू बंदी झाली - पारोमिता गोस्वामी
By Admin | Updated: June 13, 2015 01:32 IST2015-06-13T01:32:58+5:302015-06-13T01:32:58+5:30
मागील ४० वर्षांपासून चंद्रपूर जिल्ह्यात दारू सुरू होती. दारूबंदीसाठी महिलांनी पुढे येऊन अनेक आंदोलने केली.

अतिशय कष्टाने दारू बंदी झाली - पारोमिता गोस्वामी
वरोरा : मागील ४० वर्षांपासून चंद्रपूर जिल्ह्यात दारू सुरू होती. दारूबंदीसाठी महिलांनी पुढे येऊन अनेक आंदोलने केली. तुरुंगवास भोगला. अतिशय कष्टातून चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी झाली आहे. ही दारूबंदी टिकविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे, असे आवाहन श्रमिक एल्गारच्या अध्यक्ष तथा दारूबंदी आंदोलनाच्या संयोजिका पारोमिता गोस्वामी यांनी केले. वरोरा येथील महात्मा गांधी चौकात गुरूवारी आयोजित सभेत त्या बोलत होत्या.
अॅड.पारोमिता गोस्वामी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत डॉ.रजनी हजारे, अश्रफभाई मिस्त्री, सेवकराम मिलमिले, योगिता लांडगे, आबिद अली उपस्थित होते. सुरुवातीला जिल्ह्यात १०० दारूचे परवाने होते. ते २०१५ पर्यंत ६०० झाले आणि गावागावांत देशी-विदेशी, बियर शॉपी, वाईन बार उघडले गेले. दारूबंदी व्हावी, यासाठी महिलांचा संघर्ष सुरू होता. चिमूर ते नागपूर पदयात्रा काढण्यासोबतच वरोरा शहरातील महात्मा गांधी चौकात महिलांनी दारूबंदीसाठी मुंडण केले. अशा अनेक आंदोलनानंतर चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी झाली. वरोरा विधानसभा क्षेत्राचे आमदार बाळू धानोरकर यांनी जिल्ह्यात दारूबंदी फसवी ठरली असल्याचे मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले. जेमतेम दोन महिने झाले आहे. धानोरकर हे सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत. त्यांनी असे वक्तव्य करणे योग्य नाही, अशा परखड शब्दात अॅड. पारोमिता गोस्वामी यांनी त्यांचा समाचार घेतला. स्वत:च्या पक्षातील आमदारांचा विरोध झुगारून ना. सुधीर मुनगंटीवार यांनी आम्हाला दिलेला शब्द पाळत दारूबंदी करून दाखविली. याबाबत ना. मुनगंटीवार यांची अॅड.पारोमिता गोस्वामी यांनी प्रशंसा केली. दारूबंदसाठी महिलांनी व समाजातील प्रत्येक घटकाने प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. (तालुका प्रतिनिधी)