बल्लारपुरात सायकल दिवसाला उत्स्फूर्त प्रतिसाद
By Admin | Updated: December 24, 2015 01:22 IST2015-12-24T01:22:32+5:302015-12-24T01:22:32+5:30
आरोग्याला लाभदायी आणि वाढत्या प्रदूषणाला आळा बसावा, याकरिता इंधनाची वाहने न चालविता आठवड्यातून निदान एक दिवस सायकल चालवून पर्यावरण राखण्याला मदत व्हावी,

बल्लारपुरात सायकल दिवसाला उत्स्फूर्त प्रतिसाद
उपक्रमाचे कौतुक : अनेकांना आठवले बालपण
बल्लारपूर : आरोग्याला लाभदायी आणि वाढत्या प्रदूषणाला आळा बसावा, याकरिता इंधनाची वाहने न चालविता आठवड्यातून निदान एक दिवस सायकल चालवून पर्यावरण राखण्याला मदत व्हावी, या हेतूने जिल्हा पोलीस विभागाने सुरू केलेल्या सायकल दिवसाला येथे पहिल्याच दिवशी उत्तम प्रतिसाद मिळाला. या अभियानात सुमारे अडीच-तीनशे लोकांनी सहभाग घेऊन, शहरवासीयांना या अभियानात सहभागी होण्याचा संदेश दिला.
बल्लारपुरात आठवड्याच्या दर रविवारला हा उपक्रम राबविला जाणार आहे. याचा प्रारंभ करण्यात आला आहे. येथील पेपर मिल कलामंदिरपासून सुरू होऊन शहराच्या मुख्य मार्गाने होत ही सायकल यात्रा पोलीस ठाण्याच्या आवारात पोहचून तेथे समारोप झाला. समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पोलीस अधिक्षक संदीप दिवाण होते. नगरपालिचे मुख्याधिकारी विपीन मुदधा, महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. खान, वसंत खेडेकर, डॉ. नितीन कल्लूरवार, राजू दारी यांची मंचावर उपस्थिती होती. प्रदूषणाच्या चिंतेवर केवळ चर्चा न करता ते कसे दूर होईल, यावर कृती करणे गरजेचे आहे. पेट्रोल व डिझेलवर चालणाऱ्या वाहनांना एक दिवस विश्रांती देऊन त्या ऐवजी सायकल चालविणे, हा यावर सोपा व स्वस्त उपाय आहे, असे सांगत पोलीस अधिक्षक संदीप दिवाण यांनी सर्वांनी तसे करावे आणि विशेषत: पालकांनी व शिक्षकांनी आपले पाल्य व विद्यार्थी यांना त्याकरिता प्रवृत्त करावे, असे आवाहन केले.
तसेच, बल्लारपुरात या अभियानाच्या सुरूवातीलाच जो प्रतिसाद मिळाला, त्याची प्रशंसा करीत हे सातत्य कायम राहावे, यात आणखी भर पडावी याकरिता साऱ्यांनी प्रयत्न करावे असे म्हणाले. विपीन मुदधा, प्राचार्य खान आणि वसंत खेडेकर यांचीही भाषणे झालीत. प्रास्ताविक पोलीस निरीक्षक प्रदीप शिरस्कर, संचालन अजय दुबे व आभार प्रदर्शन सहायक उपनिरीक्षक लता वाढिवे यांनी केले. (तालुका प्रतिनिधी)