ऐतिहासिक तलावाला इकोर्निया वनस्पतीचा विळखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:35 IST2021-01-08T05:35:51+5:302021-01-08T05:35:51+5:30
राजुरा : शहरातील प्राचीन मालगुजारी तलाव इकोर्निया वनस्पतीच्या वेढ्यात सापडला आहे. तब्बल ६० वर्षांनंतर प्रथमच या तलावांमध्ये अशा वनस्पतीने ...

ऐतिहासिक तलावाला इकोर्निया वनस्पतीचा विळखा
राजुरा : शहरातील प्राचीन मालगुजारी तलाव इकोर्निया वनस्पतीच्या वेढ्यात सापडला आहे. तब्बल ६० वर्षांनंतर प्रथमच या तलावांमध्ये अशा वनस्पतीने शिरकाव केल्यामुळे तलावाचे सौंदर्य लोप पावलेले आहे. शिवाय तलावात मच्छी पालन करणाऱ्या बांधवांसमोर मोठे आर्थिक संकट निर्माण झाले आहे.
संपूर्ण तलावच इकोर्निया वनस्पतीने वेढलेला असल्यामुळे मच्छी पालन व मासेमारी करण्यासाठी मच्छिमार बांधवांना अडचणी येत आहेत. ऐतिहासिक तलावाचे सौंदर्य जपण्यासाठी नगरपरिषद व मच्छिंद्र मत्स्यपालन सोसायटीने कंबर कसलेली आहे.
१९६१ पासून या तलावावर मच्छिंद्र मत्स्यपालन सहकारी संस्थेद्वारे मासेमारी करण्याकरिता वापरण्यात येत आहे. जवळपास ३५० भोई समाजातील कुटुंबांचा उदरनिर्वाह या तलावावर आहे. दरवर्षी मत्स्यपालन करण्याकरिता तलावात बीज सोडण्यात येते. त्यानंतर पाच ते सहा महिन्यांनी मासे मोठे झाल्यानंतर विक्रीसाठी उपलब्ध होतात. तब्बल ६० वर्षांनंतर प्रथमच या तलावात जलीय वनस्पती वाढल्यामुळे मोठे संकट भोई समाजासमोर निर्माण झाले आहे. मागील काही महिन्यांपासून तलावाचे स्वच्छता अभियान सुरू आहे. मात्र, प्रचंड प्रमाणात इकोर्निया वनस्पती वाढल्यामुळे तलावाचे सौंदर्य नष्ट झाले आहे. तलाव स्वच्छ करण्याचे आव्हान नगरपरिषद प्रशासनासमोर आहे. यासाठी नगरपरिषद प्रशासन व मच्छिंद्र मत्स्यपालन सोसायटीचे सदस्य श्रमदान करीत आहेत.
संपूर्ण राज्यात २ ऑक्टोबर २०२० ते ३१ मार्च २०२१ पर्यंत ‘माझी वसुंधरा’ राबविण्यात येत आहे. या अभियान अंतर्गत पृथ्वी, जल, वायू, अग्नी, आकाश या पंचत्त्वावर पर्यावरण विषयक मानवी स्वभावातील बदलांसाठी जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. शैक्षणिक व सामजिक कार्यक्रमाद्वारे जनमानसात महत्त्व पटवून देणे, या अभियानाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. त्या अनुषंगाने नगरपरिषद राजुरा व मच्छिंद्र मत्स्यपालन सहकारी संस्था राजुरा यांच्या संयुक्त विद्यमाने नगर परिषदे समोरील माजी मालगुजारी तलावातील स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे. नगर परिषद राजूरचे नगराध्यक्ष अरुण धोटे, उपनगराध्यक्ष सुनील देशपांडे, स्वच्छता व वैद्याकीय समिती सभापती वज्रमला बतकमवार, तसेच सर्व समितीचे सर्व सभापती , नगर सेवक यांच्या सहभागातून राजुरा तलाव स्वच्छता आणि सोंदर्यीकरण अभियान सुरू आहे.